सातारा: वडूज-दहिवडी मार्गावर सोमवारी रात्री स्विफ्ट, ओमनी कार आणि पिकअपच्या तिहेरी अपघातात 2 जण ठार आणि 7 जण गंभीर जखमी झालेत. शिवम हणमंतराव शिंदे आणि प्रसाद उर्फ बाबू राजेंद्र सुतार (दोघेही रा. औंध, ता. खटाव) अशी मृतांची नावे आहेत. आठवडी बाजार बंद ठेवून ग्रामस्थांनी त्यांना श्रद्धांजली वाहिलीय. दरम्यान, तिहेरी अपघातात मनोज रणदिवे, सत्यम खैरमोडे, लालासो पाटोळे, ज्योती पाटोळे, रोहन भिसे, आकाश बर्गे, धनाजी सुळे हेदेखील गंभीर जखमी झालेत.
स्वामी समर्थ मंदिरानजीक दुर्घटना : वडूज-दहिवडी रस्त्यावरील स्वामी समर्थ मंदिरानजीक ही दुर्घटना घडली. शिवम शिंदे आणि प्रसाद सुतार हे सोमवारी रात्री (7 एप्रिल) स्विफ्ट (एमएच-03-डीए-७३५४) कारमधून वडूजहून दहिवडीकडं निघाले होते. प्रसाद सुतार गाडी चालवत होता. रात्री साडेदहाच्या सुमारास स्वामी समर्थ मंदिरानजीक भरधाव स्विफ्टने मारुती ओम्नीला (एमएच-14-डीएन-2758) पाठीमागून जोरात धडक दिली. त्याचवेळी समोरून येत असलेल्या पिकअपशी (एमएच-11-सीएच- 3342) स्विफ्ट कारची समोरासमोर जोरदार धडक झाली.
जखमींना उपचारासाठी सातारला हलवले : या तिहेरी अपघातात स्विफ्ट कारमधील शिवम शिंदे आणि प्रसाद सुतार ठार झाले, तर मनोज शंकर रणदिवे, सत्यम राजेंद्र खैरमोडे, पिकअप जीपमधील लालासो परशुराम पाटोळे, ज्योती लालासो पाटोळे, ओमनी कारमधील रोहन आप्पासाहेब भिसे, आकाश सोनबा बर्गे आणि धनाजी सुळे हे सात जण गंभीर जखमी झालेत. त्यांना उपचारासाठी साताऱ्याला हलविण्यात आलं. वडूज पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे.
मृतांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार: अपघातात मृत्युमुखी पडलेले शिवम शिंदे हा औंध शिक्षण मंडळाचे विश्वस्त हणमंतराव शिंदे यांचा मुलगा तर प्रसाद सुतार हा औंध शिक्षण मंडळाचे कर्मचारी राजेंद्र सुतार यांचा मुलगा आहे. दोन्ही मृतदेहांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. तसेच आठवडी बाजार रद्द करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
हेही वाचा -