नाशिक : गेल्या काही दिवसांपूर्वी एखाद्या चित्रपटाच्या कथानकाला शोभेल अशी घटना नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील लखमापूर गावात घडली होती. येथील एका युवकाशी विवाहबद्ध झालेल्या नववधूने लग्नाच्या चौथ्या दिवशी सासरच्या लोकांना गुंगीचे औषध देऊन रोख रक्कम व दागिने घेऊन पोबारा केल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर पुन्हा घोटी येथे दीड लाखात दुसरा विवाह करण्याच्या तयारीत असताना सटाणा पोलिसांनी संशयित नववधूसह तिचा मामा आणि मावशी यांना शिताफीने अटक केली आहे.
२१ मार्चला छोटेखानी विवाह झाला : मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील लखमापूर गावात वसंत पाचोरे यांच्यासाठी नातेवाईकांच्या संपर्कातील एका व्यक्तीने नांदेड येथील वधूचे स्थळ सुचवले होते. वधूचे नाव लीना मांदळे असे सांगून तिचे फोटो दाखवण्यात आले. यानंतर तरुणीशी विवाहाच्या बदल्यात वधू पक्षाला दोन लाख रुपये देण्याचे ठरले. त्यानंतर २१ मार्चला दोघांचा छोटेखानी विवाह संपन्न झाला. मात्र, वधू पक्षाने आपल्याला रजिस्टर मॅरेज करायचे आहे, असे सांगून वधू-वरांसह त्यांच्या कुटुंबीयांना २४ मार्चला नाशिक येथे बोलवले.
सटाणा पोलीस ठाण्यात नववधू विरोधात गुन्हा : ठरल्याप्रमाणे नाशिक येथे पंचवटीमध्ये रजिस्टर मॅरेज करण्यात आले. यावेळी वर पक्षाने वधू पक्षाला अधिकचे ५० हजार रुपये दिले. विवाहाचे सर्व सोपस्कार पार पडल्यानंतर पाचोरे कुटुंब लखमापूर येथे आले. चार दिवसानंतर २९ मार्च रोजी रात्री नववधू लीना मंदाळे हिने सर्वांना बनवलेल्या जेवणात गुंगीचे औषध मिसळले. यानंतर सगळ्यांनी रात्री जेवण केल्यानंतर काही वेळातच सगळे झोपी गेले. याचा फायदा घेत मध्यरात्री नववधूने पाचोरे यांच्या घरातील रोख रक्कम व दागिने घेऊन पोबारा केला होता. या घटनेनंतर वसंत पाचोरे यांनी सटाणा पोलीस ठाण्यात नववधू विरोधात गुन्हा दाखल केला होता.
पोलिसांनी सापळा रचून केली अटक : दरम्यान, सटाणा पोलिसांनी संबंधित नाशिक येथील एजंटला विश्वासात घेतले. त्यानंतर संशयित लीना मंदाळे व तिच्या सहकाऱ्यांना घोटीचे स्थळ शोधले आहे, असा बनाव करून व्हिडिओ कॉल केला. तसेच, हेच घर आहे हे पटवून देत १ लाख ६० हजारात सौदा केला. त्यानंतर संबंधित व्यक्तीने होकार देत येण्याची तयारी दर्शवली आणि ठरल्याप्रमाणे ११ एप्रिल रोजी संशयित लीना, तिचे मामा, मावशी हे घोटीत आले असता पोलिसांनी सापळा रचून त्यांना अटक केली.
विवाह करताना स्वतः खात्री करणे गरजेचे : "नववधूने फसवणूक केल्याप्रकरणी आमच्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर आम्ही याची गंभीर दखल घेतली. या प्रकरणात नववधू ही फरार झाली होती. त्यांच्या संपर्कात असलेल्या एजंटला विश्वासात घेत आम्ही सापळा रचला आणि दुसरा विवाह करण्यासाठी समोरील व्यक्ती १ लाख ६० हजार रुपये देत असल्याचं सांगितल्यानंतर वधू लीना तिचा मामा आनंदा दळवी, मावशी काशीबाई वाघमारे हे घोटीला आले. त्यावेळी आम्ही सापळा रचून त्यांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केला असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. अलीकडच्या काळात विवाहबाबत फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. विवाह जुळवताना काळजी घ्यावी बऱ्याच प्रकरणात कागदपत्रे बनावट असतात. कुठलाही निर्णय घेण्याअगोदर स्वतः खात्री करणे गरजेचे आहे", असे सटाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांनी सांगितले.
हेही वाचा :