पुणे : तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी पुण्यातील दीनानाथ रुग्णालयावर आरोप केले जात आहेत. तनिषा भिसे यांच्या मृत्यू प्रकरणात आता ससूनच्या वैद्यकीय तज्ज्ञांच्या समितीकडून तिन्ही अहवालाची तपासणी करून आज अहवाल सादर करण्यात येणार आहे. मंगळवारी दिवसभर पुण्यातील ससून रुग्णालय इथं या तज्ज्ञ समितीच्या माध्यमातून बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत भिसे यांच्या मृत्यूची जबाबदारी नेमकी कोणाची, यावर चर्चा करत समितीच्या निष्कर्षाचा अहवाल अलंकार पोलिसांकडं सुपूर्द करण्यात येणार आहे. "या अहवालाचं 90 टक्के काम पूर्ण झालं आहे. आज हा अहवाल सादर करण्यात येणार आहे," अशी माहिती ससून रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ यलप्पा जाधव यांनी दिली.

या तज्ज्ञांचा आहे समितीत समावेश : समितीमध्ये ससूनचे वैद्यकीय अधीक्षक यांच्यासह, स्त्रीरोग विभागप्रमुख, औषधशास्त्र विभागप्रमुख, न्यायवैद्यकशास्त्र विभाग प्रमुख, भूलशास्त्र विभागप्रमुख, बालरोगतज्ज्ञ विभागप्रमुख अशा सहा जणांचा समावेश होता. तनिषा भिसे मृत्यू प्रकरणातील सर्व बाबी या तज्ज्ञांकडून तपासण्यात आल्या आहेत. दीनानाथ रुग्णालय, सूर्या रुग्णालय, मणिपाल रुग्णालय आणि इंदिरा आयव्हीएफ फर्टिलिटी सेंटरच्या नोंदवण्यात आलेल्या जवाबाची तपासणी देखील या तज्ज्ञ समितीकडून करण्यात आली आहे.
ससून रुग्णालयाकडून तज्ज्ञ समिती तयार : तनिषा भिसे यांच्या कुटुंबीयांनी पुण्यातील अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावर पोलिसांनी ससून रुग्णालयाला अहवाल तयार करण्याबाबत 9 एप्रिलला पत्र दिलं. त्यानंतर शासनाच्या नियमानुसार ससून रुग्णालयाकडून तज्ज्ञ समिती तयार करून या समितीच्या माध्यमातून बैठक घेत चर्चा करण्यात आली. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत या समितीची बैठक सुरू होती. आतापर्यंत तनिषा भिसे यांच्या मृत्यूबाबत आरोग्य विभाग उपसंचालक, धर्मादाय सहआयुक्त समिती आणि मातामृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल शासनाला सादर करण्यात आला आहे. त्यातच आता ससूनच्या समितीचा अहवाल महत्त्वाचा मानला जात आहे. हा अहवाल सादर करण्यात आल्यानंतर नेमकं कोण दोषी आहे हे ठरणार आहे.

अनामत रक्कमेअभावी उपचार न मिळाल्याचा आरोप : तनिषा भिसे यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात अनामत रकमेअभावी उपचार न मिळाल्याचा आरोप केला जात आहे. नातेवाइकांनी त्याबाबत अलंकार पोलिसांकडं तक्रार केली असून पोलिसांनी त्यांचे जबाब नोंदवले आहेत. अलंकार पोलिसांनी भिसे कुटुंबीयांसह दीनानाथ रुग्णालय, सूर्या रुग्णालय, मणिपाल रुग्णालय आणि इंदिरा आयव्हीएफ फर्टिलिटी सेंटर या सर्व ठिकाणचे संबंधितांचे जबाब नोंदवून घेतले आहेत. याची सर्व माहिती आणि जबाब पोलिसांनी ससूनच्या मेडिकल बोर्डाकडं सुपूर्द केली. या प्रकरणात वैद्यकीय निष्काळजीपणा झाला आहे का, ? याबाबत मत देण्याची विनंती रुग्णालयाला केली आहे. त्यानुसार या समितीनं अहवाल सादर केला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
समितीचं 90 टक्के काम पूर्ण झालं : याबाबात ससूनचे वैद्यकीय अधीक्षक डॉ यलप्पा जाधव म्हणाले की, "तनिषा भिसे प्रकरणात पुण्यातील अलंकार पोलीस स्टेशन यांच्याकडून ससून हॉस्पिटल यांना पत्र मिळालं होत. त्या पत्राच्या अनुषंगाने समितीची काल बैठक पार पडली आहे. ८० ते ९० टक्के काम हे पूर्ण झालं असून आज अहवाल सादर केला जाणार आहे."
हेही वाचा :