पुणे : गर्भवती तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर आरोप केले जात आहेत. तनिषा भिसे यांच्या मृत्यू प्रकरणी ससूनच्या वैद्यकीय तज्ज्ञांच्या समितीकडून तिन्ही अहवालांची तपासणी करून बुधवारी संध्याकाळी तो अहवाल पोलिसांना देण्यात आलाय. अहवाल देऊन एक दिवस पूर्ण झाला असताना देखील अजूनही यात काय आहे हे स्पष्ट झालेलं नाही. ससूनकडून देण्यात आलेला अहवाल हा सहा पानांचा असून, यात दीनानाथ रुग्णालय आणि डॉ.घैसास यांच्यावर कोणताच ठपका ठेवण्यात आलेला नाही, असं सांगितलं जात आहे. मात्र, याबाबत अधिकृत कोणीही माहिती दिलेली नाही.
अहवालात नेमकं काय? : तनिषा भिसे कुटुंबीयांनी पुण्यातील अलंकार पोलीस स्टेशन येथे दीनानाथ रुग्णालयाच्या संदर्भात तक्रार दिली होती. यानंतर पोलिसांनी ससून रुग्णालयाला अहवाल तयार करण्याबाबत ९ एप्रिल रोजी पत्र दिलं होतं. शासनाच्या नियमानुसार ससून रुग्णालयाकडून ससूनचे वैद्यकीय अधीक्षक यांच्यासह स्त्रीरोग विभागप्रमुख, औषधशास्त्र विभागप्रमुख, न्यायवैद्यकशास्त्र विभागप्रमुख, भूलशास्त्र विभागप्रमुख, बालरोगतज्ज्ञ विभागप्रमुख अशा सहा जणांची समिती तयार करण्यात आली आणि या समितीच्या माध्यमातून बैठक घेत चर्चा करत बुधवारी संध्याकाळी तो अहवाल पोलिसांना देण्यात आला आहे.
अहवाल अलंकार पोलिसांकडे सादर : आतापर्यंत तनिषा भिसे यांच्या मृत्यूबाबत आरोग्य विभाग उपसंचालक, धर्मादाय सहआयुक्त समिती आणि मातामृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल शासनाला सादर करण्यात आले आहेत. त्यातच आता ससूनच्या समितीचा अहवाल महत्त्वाचा मानला जात असताना, हा अहवाल सादर होऊनही या अहवालात नेमकं काय म्हटलं आहे याबाबत अजूनही स्पष्ट झालेलं नाही. भिसे यांच्या मृत्यूची जबाबदारी नेमकी कोणाची? यावर चर्चा करत समितीच्या निष्कर्षाचा अहवाल अलंकार पोलिसांकडे देण्यात आळा आहे.
समितीकडून जबाबाची तपासणी : तनिषा भिसे मृत्यू प्रकरणातील सर्व बाबी या तज्ञांकडून तपासल्या आहेत. दीनानाथ रुग्णालय, सूर्या रुग्णालय, मणिपाल रुग्णालय आणि इंदिरा आयव्हीएफ फर्टिलिटी सेंटर यांच्या नोंदविण्यात आलेल्या जबाबाची तपासणी देखील या तज्ञ समितीकडून केली आहे.
पोलिसांनी नोंदवले जबाब : तनिषा भिसे यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात अनामत रकमेअभावी उपचार न मिळाल्याचा आरोप केला जात आहे. नातेवाईकांनी त्याबाबत अलंकार पोलिसांकडे तक्रार केली असून, पोलिसांनी त्यांचे जबाब नोंदवले आहेत. अलंकार पोलिसांनी भिसे कुटुंबीयांसह दीनानाथ रुग्णालय, सूर्या रुग्णालय, मणिपाल रुग्णालय आणि इंदिरा आयव्हीएफ फर्टिलिटी सेंटर या सर्व ठिकाणच्या संबंधितांचे जबाब नोंदवून घेतले आहेत. सर्व माहिती व जबाब पोलिसांनी ससूनच्या मेडिकल बोर्डाला दिले होते. या प्रकरणात वैद्यकीय निष्काळजीपणा झाला आहे का? याबाबत मत देण्याची विनंती रुग्णालयाला केली आहे. त्यानुसार या समितीने अहवाल सादर केला आहे.
हेही वाचा - २ दिवसांत कर भरा अन्यथा...; अखेर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला पुणे पालिकेची मिळकतकर वसुलीसाठी नोटीस