सांगली - राज्याच्या राजकारणात सातत्यानं राजकीय उलथापालथ सुरू आहेत. शिवसेना नेते आणि सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी येत्या दिवसांत अनेक नेते उद्धव यांची शिवसेना सोडून शिंदेंच्या शिवसेनेत येणार असल्याचं सांगितलंय. सांगली मतदारसंघातून शिवसेना (यूबीटी) उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूक लढवणारे नेते चंद्रहार पाटील 9 जून रोजी सत्ताधारी शिवसेनेत सामील होणार आहेत, असंही संजय शिरसाट यांनी सांगितलंय.
शक्य असेल तर त्यांना थांबवून दाखवा : या महिन्याच्या अखेरीस अनेक लोक आमच्या पक्षात सामील होतील. चंद्रहार पाटीलही आमच्या पक्षात सामील होणार आहेत. शक्य असेल तर त्यांना थांबवून दाखवा. उद्धव ठाकरेंच्या पक्षावर टीका करताना ते म्हणाले की, त्यांच्यासोबत कोणीही राहण्यास तयार नाही आणि त्यांनी त्यांच्या पक्षाचे कामकाज पाहावे. सांगली मतदारसंघ हा लोकसभा निवडणुकीत अत्यंत चुरशीचा होता. काँग्रेस नेते विशाल पाटील यांनी शिवसेनेचे (यूबीटी) उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली. विशाल पाटील यांनी भाजपाचे विद्यमान खासदार संजय काका पाटील यांचा पराभव करून विजय मिळवला, तर चंद्रहार पाटील यांना त्यांचे डिपॉझिट गमवावे लागल्यामुळे ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले.

मी अधिकृत भूमिका घेतलेली नाही : विशेष म्हणजे संजय शिरसाट यांनी चंद्रहार पाटील शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा केला असतानाच आता चंद्रहार पाटलांनी ट्विट करीत या चर्चांना पूर्णविराम दिलाय. माझ्या पक्षप्रवेशाच्या बाबतीत मी अधिकृत भूमिका घेतलेली नाही, शिवसेना शिंदे गटाकडून पक्ष प्रवेशाबाबत मला ऑफर आहे. पक्षप्रवेश करायचा, पक्ष सोडायचा याबाबतचा अजून निर्णय घेतलेला नाही, सध्या मी बाहेरगावी असून, माझ्या कार्यकर्त्यांसोबत बोलून पुढील निर्णय घेईन, असंही डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांचे X अकाऊंटवरून ट्विट करीत सांगितलंय.
हेही वाचाः
कोल्हापुरात थरार: लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरुणीनं लग्नास दिला नकार, प्रियकरानं केला खून
"शिवराज राक्षेनं पंचांना गोळ्या घालायला पाहिजे होत्या"; पैलवान चंद्रहार पाटील यांचं खळबळजनक वक्तव्य