ETV Bharat / state

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं 31 हजार कोटींचं पॅकेज फसवं, केवळ 5 हजार कोटीच शेतकऱ्यांच्या पदरात पडणार - संजय राऊत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं 31 हजार कोटींचं पॅकेज धुळफेक आहे. प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हातात 5 हजार कोटीच पडणार आहेत, असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला.

Sanjay Raut
संजय राऊत (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : October 11, 2025 at 11:20 AM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या ‘ शेतकऱ्यांचा हंबरडा’ या शेतकरी मोर्चावर भाजपानं जोरदार टीका केली आहे. या टीकेला उत्तर देताना खासदार संजय राऊत यांनी भाजपवार तीव्र शब्दांत हल्लाबोल केला आहे. "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेले 31 हजार कोटींचं पॅकेज हे केवळ एक धुळफेक आहे. प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हातात केवळ 5 हजार कोटीच पडणार आहेत," असा गंभीर आरोप त्यांनी केला. शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्याऐवजी केवळ घोषणा करून जनतेची दिशाभूल केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

Sanjay Raut's letter
संजय राऊत यांचं पत्र (ETV Bharat)

बावनकुळेंची टीका, राऊतांचं प्रत्युत्तर : खरं तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मराठवाड्यात होणाऱ्या हंबरडा मोर्चावर भाजपानं कडवट टीका केली आहे. "ज्यांनी मराठवाड्याच्या विकासाकडे दुर्लक्ष करून निजामासारखे व्यवहार केले, ते आता शेतकऱ्यांच्या नावावर राजकारण करत आहेत," असा टोला महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला.

याला प्रत्युत्तर देताना संजय राऊत म्हणाले, "या मोर्चावर टीका करणं म्हणजे शेतकऱ्यांचा अपमान आहे. अस्मानी आणि सुलतानी संकटांमुळे मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या करत आहेत. मुख्यमंत्री फडणवीसांनी जाहीर केलेलं 31 हजार कोटींचं पॅकेज म्हणजे फसवणूक आहे. प्रत्यक्षात हे पॅकेज 5 हजार कोटींचंच आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या, 50 हजार प्रति हेक्टर मदत आणि कर्जमाफी, याकडे सरकारने पूर्णपणे दुर्लक्ष केलं आहे."

भाजपा हा ठेकेदारांचा पक्ष : भाजपा हा ठेकेदारांचा पक्ष असल्याची जोरदार टीका संजय राऊत यांनी केली आहे. "भाजपा हा निगरगठ्ठ, निर्ढावलेल्या मनाचा आणि ठेकेदारांचा पक्ष आहे. त्यांना शेतकऱ्यांच्या दुःखाची काय चिंता? आमचा हंबरडा मोर्चा प्रचंड होईल आणि शेतकऱ्यांचा आक्रोश थेट दिल्लीपर्यंत पोहोचेल," असं राऊत म्हणाले. भाजपानं उबाठाला 'मेलेला पक्ष' असा टोमणा लगावल्यानंतर राऊत म्हणाले, "आम्ही जिवंत आहोत आणि तुमच्या छाताडावर पाय देऊन जिवंत आहोत. म्हणूनच तुम्हाला आमची भीती वाटते."





राज-उद्धव, शरद पवार निवडणूक आयुक्तांना भेटणार : 14 ऑक्टोबर रोजी दुपारी 12:30 वाजता विरोधी पक्षांचं सर्वपक्षीय शिष्टमंडळ राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांची भेट घेणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली. या शिष्टमंडळात शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांचा सहभाग असेल. "मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पारदर्शक आणि निष्पक्ष व्हाव्यात, यासाठी ही भेट आहे. निवडणूक यंत्रणेवर कोणताही संशय राहू नये, ही आमची भूमिका आहे. लोकशाही बळकट व्हावी आणि निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास वाढावा, हाच आमचा उद्देश आहे," असं राऊत यांनी सांगितलं.

मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळात सहभागी व्हावं : त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या शिष्टमंडळात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. "हा राजकीय हेतू नाही, तर लोकशाही वाचवण्याचा प्रयत्न आहे," असंही त्यांनी स्पष्ट केलं. या भेटीनंतर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे सर्व नेत्यांची पत्रकार परिषद होणार आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

हेही वाचा