मुंबई : "छत्रपतींच्या महाराष्ट्रावर सुडानं कारवाई करणार, छत्रपतींबाबत ज्ञान देणार आणि त्यांच्या बाजूला बसलेले छत्रपतींचे वंशज माना डोलवणार, इतकी वाईट वेळ महाराष्ट्रावर आलेली नाही. औरंगजेबाचं थडगं हटवण्याच्या कामानं भाजपाची माणसं भारावून गेली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी चित्रपटाचे खास शो आयोजित केले. त्यामुळं लोक भडकले. भाजपानं औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापवलं. आम्ही औरंगजेबाच्या कबरली थडगं म्हणतो पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मेघडंबरीसमोर देशाच्या गृहमंत्र्यांनी औरंगजेबाची समाधी असा उल्लेख केला हे अत्यंत दुर्दैवी आणि अपमानास्पद आहे. औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झाला, त्यामुळं त्याच्या थडग्याला समाधीचा दर्जा दिला जातोय का? भाषणादरम्यान केंद्रीय गृहमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवाजी असा एकेरी उल्लेख पूर्ण भाषणात सातत्यानं केला. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे. त्याविरोधात मुख्यमंत्र्यांनी अमित शाहांवर छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करून अपमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची गरज आहे," अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केलीय.
छत्रपतींच्या दोन्ही वंशजांना निमंत्रण देण्याची गरज : "तीन महिन्यांपासून औरंगजेबाच्या थडग्यावरून दंगली पेटवल्या जात आहेत. मात्र, रायगडावर येऊन केंद्रीय गृहमंत्री शाह यांनी औरंगजेबाची समाधी असा उल्लेख केला हे दुर्दैवी आहे. या कार्यक्रमाला सातारा आणि कोल्हापूर इथल्या दोन्ही गाद्यांच्या वंशजांना निमंत्रण देण्याची गरज होती. मात्र, केवळ भाजपात असलेल्या उदयनराजेंना निमंत्रित केलं. कोल्हापूरच्या गादीचे वंशज असलेल्या शाहू महाराज, संभाजी महाराजांना बोलावलं नाही. अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं राजकारण पाहून छत्रपती शिवाजी महाराजांना किती वाईट वाटत असेल," असं म्हणत संजय राऊतांनी भाजपावर जोरदार हल्ला चढवला.
हे तर ढोंगी चाहते : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे छत्रपती शिवाजी महाराजांचे ढोंगी चाहते आहेत. अमित शाहांनी केलेल्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी कोणताही आक्षेप घेतला नाही. औरंगजेबच्या थडग्याला दुसऱ्यानं समाधी म्हटलं असतं तर, शिंदे आणि फडणवीसांनी थयथयाट केला असता. मात्र, शाह यांनी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्यावर देवेंद्र फडणवीसांनी एक शब्द देखील काढला नाही हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. त्यांचे शिवाजी महाराजांवरील प्रेम ढोंगी आहे, शिवाजी महाराजांचा अपमान होत असताना हे नेते तिथं हजर होते, अस म्हणत संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यावर टीका केली.
बकरा कापला जाईल : छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान केलेल्या प्रशांत कोरटकरच्या सुरक्षेसाठी फडणवीसांनी पोलीस संरक्षण दिलंय. काल शाह यांनी ज्या प्रकारे शिंदेंना हटवलं, त्यावरून बकरा कापला जाईल. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात निधीवरून, पैशांवरून एक दिवस नक्कीच दंगल, मारामारी होईल, असं भाकीत खासदार संजय राऊतांनी वर्तवलंय.
हेही वाचा :