अहमदाबाद : आयुष्यात पहिल्यांदाच विमानात बसण्यापूर्वी एका आईबापाच्या डोळ्यात धाकट्या मुलाला लंडनला जाऊन भेटण्याची ओढ होती. मात्र ती भेट होण्याआधीच आईबापाचे डोळे मिटतील असं कधी कुणालाच वाटलं नव्हतं. ही व्यथा आहे सांगोल्यातील पवार दाम्पत्याची. मूळचे सांगोल्यातील असलेले महादेव पवार आणि आशाताई पवार हे गुजरातमधील कापड मिलमध्ये नोकरीस होते. मात्र अहमदाबाद विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला.
ना भावाची भेट झाली, ना मुलाची : महादेव पवार आणि आशाताई पवार हे ज्येष्ठ नागरिक बुधवारी लंडनकरता रवाना झाले होते. आपला आयुष्यातला पहिलाच विमान प्रवास अवघ्या काही सेकंदांचा असेल, असं या दाम्पत्याला कधीच वाटलं नव्हतं. पण नियतीला काहीतरी वेगळचं मंजूर होतं. विमानात बसण्यापूर्वी झालेल्या कॉलमध्ये आपल्या आजारी लहान भावाला, 'तब्येतीची काळजी घे' असं महादेव पवार यांनी म्हटलं होतं. परत आल्यावर भेटायला येतो, असा शब्दही दिला होता. मात्र महादेव पवार यांची ना मुलाशी भेट झाली ना आता कधी ते आपल्या भावाला भेटू शकतील.
महादेव आणि आशाताई पवार यांचा पहिला आणि अखेरचा विमानप्रवास : अहमदाबाद इथं झालेल्या भीषण विमान अपघातात सांगोला तालुक्यातील हातीद गावचे मूळ रहिवासी असलेले महादेव पवार आणि त्यांच्या पत्नी आशाताई पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. काल सकाळी विमानात बसण्यापूर्वी महादेव पवार यांनी आपले धाकटे बंधू भाऊ पवार यांना फोन करून औषधं वेळेवर घे आणि मी लंडन वरून आल्यावर तुला पुन्हा भेटतो, असा शब्द दिला होता. मात्र नियतीनं ही भेट अधुरीच ठेवली. काही दिवसापूर्वीच पवार दाम्पत्य गावाकडं येऊन काही दिवस राहून गेलं होतं.
कोण होते महादेव पवार : महादेव पवार हे मूळचे सांगोला तालुक्यातील हातीद गावचे रहिवासी. महादेव पवार हे अहमदाबादजवळील नाडियाद इथं एका सूतगिरणीमध्ये कामाला होते. पण नोकरीनिमित्त गुजरातमध्ये जाऊनही त्यांचा मराठी मातीचा ओढा कधी कमी झाला नाही. महादेव पवार यांचा एक मुलगा अहमदाबाद इथं चालकाचं काम करतो, तर धाकट्या मुलानं लंडनमध्ये स्वत:चा व्यवसाय सुरू केला आहे. याच मुलाच्या भेटीसाठी पवार दाम्पत्य अहमदाबादहून लंडनला निघालं होतं. ही एक अचानक भेट असल्यानं धाकट्या मुलाला याची फारशी कल्पना नव्हती. महादेव यांचे लहान बंधू भाऊ पवार यांच्यावर नुकतीच महिन्यापूर्वी हृदयाची शस्त्रक्रिया झाली होती. अगदी विमानात बसण्यापूर्वीही त्यांनी आपल्या धाकट्या भावाला सारी औषधं वेळेवर घे आणि मी लंडन जाऊन आलो की, भेटायला येतो, असा शब्दही त्यांनी भावाला दिला होता.
हेही वाचा :