सांगली - आपल्यालापण मंत्रिपद मिळावं, अशी भावना सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटलांनी व्यक्त केली आहे. मी पण आज प्रथमच अपक्ष खासदार म्हणून निवडून आलो आहे. भविष्यात मी काँग्रेस सोबत नाही तर दुसऱ्या कोणत्या तरी पक्षात जाईन. जसे गोरेंना मंत्रिपद मिळाले, तसे मला देखील पुढे जाऊन मंत्रीपद मिळेल, आम्ही पण पुढे जावू अशी आशा असल्याचं खासदार विशाल पाटलांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या कार्यक्रमात जाहीरपणे बोलून दाखवलं आहे.
आम्हाला पण मंत्रिपद मिळावं - मिरजमध्ये महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्यावतीने डिजिटल मीडिया अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाच्या निमित्ताने ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील एकत्रित होते. यावेळी बोलताना विशाल पाटील म्हणाले की, जयकुमार गोरे या ठिकाणी आलेले आहेत, ते आपले जावई आहेत. त्यांची सासुरवाडी आमच्या शेजारी आहे, भिंतीला भिंत लागून आहे. योगायोग असा आहे की ते पहिल्यांदा अपक्ष म्हणून निवडून आले. मी देखील अपक्ष म्हणून पहिल्यांदा निवडून आलो आहे. मी कुठेतरी काँग्रेसमध्ये जाईन किंवा कुठल्या तर पक्षामध्ये जाईन, पण कुठेतरी पुढे जाऊन आम्हाला पण मंत्रिपद मिळावं. जशी तुमची सुरुवात झाली आहे, तशी आमची पण कुठेतरी सुरुवात व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करतो, अशा शब्दात खासदार विशाल पाटील मंत्री पदासाठी इच्छुक असल्याचं या निमित्ताने स्पष्ट झालं आहे. विशाल पाटलांच्या या भूमिकेमुळे सांगली जिल्ह्यातल्या राजकीय आणि काँग्रेस वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत. तसेच ते भाजपाच्या वाटेवर आहेत का? असा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
आता चर्चानां उधाण - विशाल पाटील 2024 च्या लोकसभा निवडणुकीत सांगलीमधून अपक्ष म्हणून निवडून आले आहेत. काँग्रेस पक्षाकडून त्यांना उमेदवारी नाकारली होती. शिवसेना ठाकरे पक्षाला या ठिकाणी उमेदवारी मिळाली होती. त्यामुळे अपक्ष म्हणून निवडणूक लढवताना विशाल पाटील यांना काँग्रेसचे जिल्ह्याचे नेते विश्वजीत कदम आणि सांगलीच्या काँग्रेसने संपूर्ण ताकद दिली होती. विश्वजीत कदम हे लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील यांचे पायलट असल्याची चर्चा सगळीकडे होती. त्यानंतर विश्वजित कदम यांनी देखील लोकसभा निवडणुकीत आपण विशाल पाटलांना संपूर्ण मदत केल्याचं जाहीर केलं होतं. लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर विशाल पाटलांनी काँग्रेसचं सहयोगी सदस्यत्व स्वीकारलं होतं. त्यामुळे संसदेत विशाल पाटील काँग्रेस सोबत आहेत.
विशाल पाटील भाजपात जाणार का? - मात्र काही दिवसांपूर्वी भाजपाचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विशाल पाटलांना भाजपात येण्याबाबतची जाहीर ऑफर दिली होती. त्यावेळी विशाल पाटलांनी आपण भाजपासोबत जाणार नसल्याची भूमिका देखील स्पष्ट केली होती. मात्र त्यांच्या नव्या भूमिकेमुळे राजकीय क्षेत्रात आता चर्चानां उधाण येणार असून मंत्रिपदाच्या अपेक्षेमुळे विशाल पाटील भाजपात जाणार का? असा प्रश्न देखील यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
हेही वाचा...