ETV Bharat / state

प्रतीक्षा संपली, ८ तासांमध्येच पोहोचा मुंबईच्या वेशीवर; ५ जून रोजी समृद्धी महामार्ग शेवटच्या टप्प्याचे उद्घाटन

५ जून रोजी समृद्धी महामार्ग शेवटच्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे. एमएसआरडीसी व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी ही माहिती दिली.

समृद्धी महामार्ग
समृद्धी महामार्ग (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : June 2, 2025 at 6:34 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई - राज्याची राजधानी मुंबई आण‍ि उपराजधानी नागपूर या दोन शहरांमधील अंतर आता आणखी कमी होणार आहे. या दोन शहरांना जोडणाऱ्या बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या आण‍ि महत्त्वाच्या टप्प्याचे लोकार्पण ५ जून रोजी होणार असून इगतपुरी येथे हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते इगतपुरी ते ठाणे जिल्ह्यातील आमणे या ७६ किलोमीट अंतराच्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी ही माहिती दिली. त्यास मुख्यमंत्री कार्यालयानेदेखील दुजोरा दिला आहे.


जलदगती महामार्गाची गरज - राज्याची राजधानी आण‍ि उपराजधानीला जोडण्यासाठी अतिशय जलदगती महामार्गाची गरज लक्षात घेता समृद्धी महामार्गाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला होता. मुंबई ते नागपूर हा प्रवास साधारणत: १६ ते १८ तासांचा आहे. तो समृद्धी महामार्गाद्वारे निम्म्यावर आणण्याचे प्रमुख उद्दीष्ट होते. मुंबई ते नागपूर असा ७०१ किलोमीटर लांबीचा समृद्धी महामार्ग असून त्यापैकी सध्या ६२५ किलोमीटर अंतराचा नागपूर ते इगतपुरी असा टप्पा सुरू आहे. त्यापुढील ७६ किलोमीटर अंतराच्या आमणेपर्यंतच्या टप्प्याचे काम शिल्लक होते. ते एप्र‍िल मह‍िन्यातच पूर्ण झाले होते. त्यानंतर आमणे ते वडपेपर्यंत मुंबई-नाशिक महामार्गाला जोडणाऱ्या जोडरस्त्याचे काम सुरू होते. तेदेखील पूर्ण झाले होते. त्यानंतर सर्वांना हा टप्पा कधी सुरू होतो, याची प्रतीक्षा होती. आता नागर‍िकांना आमणे, म्हणजेच मुंबईच्या वेशीपासून थेट नागपूरला नॉन-स्टॉप जाता येणार आहे, ते देखील सुसाट.

टप्प्याटप्प्यातील समृद्धी - समृद्धी महामार्गाचे कामकाज २०१९मध्ये सुरू करण्यात आले होते. सुमारे ५५ हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे. सुरुवातीला नागपूर ते शिर्डी या ५२० किलोमीटर अंतराच्या पहिल्या टप्प्याचे ११ डिसेंबर २०२२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूर येथे उद्घाटन केले होते. त्यानंतर शिर्डी ते भरवीर या ७० किलोमीटर अंतराच्या टप्प्याचे २६ मे २०२३ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते. पुढे भरवीर ते इगतपुरी हा २५ किलोमीटर अंतराचा मार्ग मार्च २०२४मध्ये सुरू करण्यात आला. त्यानंतर आमणेपर्यंत पुढील टप्पा कधी सुरू होणार, याची प्रतीक्षा होती.

१ मेचा मुहुर्त हुकला - समृद्धीच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. त्यामुळे शेवटच्या टप्प्याचे उद्घाटन त्यांच्याच हस्ते व्हावे, हा राज्य सरकारचा प्रयत्न होता. १ मे रोजी महाराष्ट्र दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत होते. मात्र, हा मुहूर्त हुकला होता. या मार्गावरील सर्व कामे पूर्ण झालेली होती. उद्घाटनाअभावी टोलद्वारे मिळणारे उत्पन्नदेखील होत नव्हते. त्यातच सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ४ आठवड्यात जाहीर करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे आचारसंहिता लागण्यापूर्वी अखेरच्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात येत आहे.

७.७४ किलोमीटर लांबीचा बोगदा - समृद्धी महामार्गावर शहापूर तालुक्यात वाशाळा येथे ७.७४ किलोमीटर लांबीचा बोगदा आहे. हा राज्यातील सर्वात मोठा बोगदा असून त्यामुळे कसारा घाट अगदी काही मिन‍िटांमध्ये ओलांडता येणार आहे. आमणेपर्यंतचा टप्पा सुरू झाल्यानंतर नाशिकपर्यंतचे अंतरदेखील ४० किलोमीटरने कमी होणार असून कसारा घाटातील कोंडीदेखील टळणार आहे. त्यामुळे नाशिकपर्यंतच्या प्रवासासाठी लागणार वेळदेखील सुमारे तासाभराने कमी होणार आहे.

हेही वाचा...

  1. कोट्यवधी खर्च करून तयार केलेल्या समृद्धी महामार्गावर भेगाच नाही तर खड्डे देखील; टोल देऊनही जीव मुठीत घेऊन प्रवास
  2. वर्षातच समृध्दी महामार्गाला तडे, तातडीनं दुरुस्ती सुरू
  3. दीड वर्षातच ‘समृद्धी’ला भगदाड; शिंदे-फडणवीस सरकारचा भ्रष्टाचारही उघड - नाना पटोले