मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या समृद्धी महामार्गाच्या अखेरच्या टप्प्याचं आज लोकार्पण करण्यात आलं. या महामार्गामुळं मुंबई ते नागपूर हा सोळा तासांचा प्रवास आता केवळ आठ तासांत होणार आहे. यावेळी समृद्धी महामार्ग झाला आता शक्तिपीठ महामार्गाचं काम सुरू होणार, असं म्हणत शक्तिपीठ महामार्ग पूर्ण करण्याचा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. दरम्यान, विशेष समृद्धी प्रकल्पाच्या निमित्तानं सदर प्रकल्पाची सुरुवात करणारे आणि प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण करणारे देवेंद्र फडणवीस हे पहिले मुख्यमंत्री ठरले असल्याची टिप्पणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.
महाराष्ट्राच्या समृद्धीचा एक इकॉनोमिक कॉरिडोर : या उद्घाटन कार्यक्रमाच्या भाषणादरम्यान उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "आमच्या महायुती सरकार करता ही आनंदाची गोष्ट आहे. जे स्वप्न आम्ही 2014 नंतर महायुतीचं सरकार आल्यावर पाहिलं होतं. त्याची एक प्रकारे पूर्तता आज इथं होत आहे. समृद्धी महामार्ग हा केवळ रस्ता नसून हा महाराष्ट्राच्या समृद्धीचा एक इकॉनोमिक कॉरिडोर आहे. त्यासाठीच आपण याला हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग असं नाव दिलेलं आहे. जवळपास महाराष्ट्राचे 24 जिल्हे या महामार्गामुळं जोडले गेले आहेत. जेएनपीटी पोर्टसोबत कनेक्टेड आहेत. सोबतच हा महामार्ग नवीन वाढवण बंदरासोबत देखील जोडणार आहोत. त्यामुळं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विकास पोहोचण्याचं काम या महामार्गामुळं होणार आहे."
आता शक्तीपीठ महामार्ग तयार करायचाय : पुढं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "एकनाथ शिंदे आणि आम्ही ज्यावेळी या रस्ते विकासाचं काम सुरू केलं, त्यावेळी अनेकांनी हे काम अपूर्ण राहील असं म्हटलं. अनेक नेत्यांनी त्यावर टीका केली. आज आम्ही महायुतीचे नेते या रस्त्याच्या उद्घाटनाला आलो आहोत. यापुढं आम्हाला शक्तीपीठ महामार्ग तयार करायचा आहे. तो देखील असाच रस्ता असेल. त्या महामार्गामुळं संपूर्ण मराठवाड्याचे आर्थिक चित्र बदलणार आहे. असा हा शक्तिपीठ महामार्ग असणार आहे. त्याचं देखील काम लवकरच सुरू करण्यात येईल," अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
हा एक गेम चेंजर प्रकल्प ठरणार : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "हा सर्वात टफ आणि चॅलेंजिंग प्रकल्प होता. सुरुवातीच्या काळात हा प्रकल्प होईल की नाही, अशी शंका होती. काही लोकांना वाटत होतं की हा प्रकल्प होऊ नये. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, एकनाथजी आपल्याला हा प्रकल्प पूर्ण करायचा आहे. मोठ्या प्रमाणात या प्रकल्पाचा नागरिकांना फायदा होणार आहे. विदर्भात या रस्त्यामुळं मोठ्या प्रमाणात औद्योगीकरण येईल. हा केवळ महामार्ग नसून, ही एक इकोसिस्टिम तयार होतेय. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जिथं 18 तास लागत होते तिथं आता केवळ आठ तास लागणार आहेत. यामुळं प्रदूषण वाचेल. इंधन वाचेल. इंडस्ट्री केंद्र येत आहेत. त्यामुळं खऱ्या अर्थानं हा एक गेम चेंजर प्रकल्प ठरणार आहे. पर्यावरण पूरक हा रस्ता केलेला आहे. यात आम्ही अगदी छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष दिलं आहे."
...हे फार क्वचित पाहायला मिळतं : उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, "या महामार्गाबाबत छत्रपती संभाजीनगरला एक मीटिंग झाली. या मीटिंगमध्ये महामार्गाला विरोध करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. अनेकांनी याला विरोध केला. जमीन मालकांनी जमीन देण्यास विरोध केला. मात्र, त्यांची बैठक घेण्यात आली. त्यांची समजूत काढण्यात आली. त्यांना त्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला देण्यात आला. त्यानंतर त्यांनी आपला विरोध मागे घेतला. पूर्वी दोन लाख वाहनं इथून जात होती. आता मे 2025 मध्ये इथून दहा लाख वाहनं जात आहेत. लवकरच पुणे-मुंबई रस्त्याचं आपण काम करतोय. तिथं जगातील सर्वात पाच मोठ्या रुंदीच्या ब्रिजचं काम होत आहे. ते देखील आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. 55 हजार 500 कोटींची किंमत या प्रकल्पाची होती. आज 61 हजार पर्यंत खर्च आला आहे. 2014 ते 2019 काळात मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी याची सुरुवात केली. आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री असताना त्यांनी या मार्गाचा शेवट केला. हे फार क्वचित पाहायला मिळतं. अशाच पद्धतीची कामं महायुती सरकारच्या काळात केली जात आहेत. एकनाथ शिंदेंचे देखील या समृद्धी महामार्गात योगदान राहिलेला आहे. हे आपल्याला विसरता येणार नाही."
हेही वाचा :
- आंब्याच्या फेकलेल्या कोयीतून नव्या रोपांचा जन्म; मेळघाटच्या पायथ्याशी चालते प्रक्रिया
- "आमचे वडील जरी बांगलादेशातून घुसखोरी करून आले त्यात आमचा काय दोष? आम्हाला परत पाठवू नका," तीन बहिणींची हायकोर्टात याचिका
- "महायुती सरकारनं मुंबई आणि महाराष्ट्र अदानी समूहाला गहाण ठेवला आहे का?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल