मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या समृद्धी महामार्गाच्या अखेरच्या टप्प्याचं गुरूवारी लोकार्पण करण्यात आलं. त्यामुळं आता नागपूर ते मुंबई आणि मुंबई ते नागपूर हा सोळा तासाचा प्रवास केवळ आठ तासात करणं शक्य झालय. या एकूण 701 किलोमीटर लांबीच्या एक्सप्रेसवेचा शेवटचा टप्पा इगतपुरी ते आमणे 76 किलोमीटर लांबीचा आहे. या महामार्गावर देशातील सर्वात रुंद भुयारी मार्ग बांधण्यात आला. तसेच हा देशातील पहिला स्मार्ट बोगदादेखील आहे.
2025 च्या मध्याला महामार्ग वाहतुकीसाठी खुला : इगतपुरी ते आमणे बोगद्याचं वैशिष्ट्य म्हणजे आग लागल्यास तापमान 60 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचताच या भुयारी मार्गावरील अग्निशमन यंत्रणा सुरू होते. तत्काळ आगीवर नियंत्रण मिळवण्यात मदत होते. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचं बांधकाम सन 2016 मध्ये सुरू झालं होतं. आता 2025 च्या मध्याला हा महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.

23 हजार टन सिमेंट तर 400 टन स्टीलचा वापर : इगतपुरी ते आमणे या शेवटच्या टप्प्यात कसारा घाट भुयारी मार्ग तयार करण्यात आला आहे. हा देशातील सर्वात रुंदीनं मोठा भुयारी मार्ग असून, त्याची लांबी 7.8 किलोमीटर आहे. कसारा घाटातील या भुयारी मार्गासाठी सुमारे 23 हजार टन सिमेंट वापरण्यात आलं आहे. तर 400 टन स्टील वापरण्यात आलं आहे. हा बोगदा ओलांडण्यासाठी केवळ 7 मिनिटे लागतात. हा बोगदा दोन वेगवेगळ्या वायरडक्ट्स वापरून बांधण्यात आला आहे. त्यापैकी एकाची उंची 9.10 मीटर आणि दुसरी 12.95 मीटर आहे. बोगद्याच्या आत ऑक्सिजन पुरवण्याची संपूर्ण व्यवस्था आहे. त्यासोबतच मोबाईल नेटवर्क आणि इंटरनेट सुविधादेखील उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळं हा भुयारी मार्ग म्हणजे इंजिनियरिंगचा एक उत्तम नमुना मानला जात आहे.

महामार्गात वेगवेगळ्या प्रकारचे उड्डाणपूल आणि मार्ग : महामार्गाचा सुरुवातीचा प्रस्तावित खर्च हा 55 हजार 335 कोटी रुपये इतका होता. पुढं त्यात वाढ होऊन हा एकूण खर्च 61 हजार कोटी रुपये झाला. 701 किलोमीटरचा हा महामार्ग असून, यात वेगवेगळ्या प्रकारचे उड्डाणपूल आणि भुयारी मार्ग आहेत. यात वायर्डक्ट मार्ग आहेत. वन्यजीवांना संचाराकरता कोणताही अडथळा होऊ नये, म्हणून जवळपास 100 अंडरपास संरचना या ठिकाणी करण्यात आल्या आहेत. कॅमेरा ट्रॅपमधून वन्यजीवांचा अंडरपासमधून विहार पाहता येतो. या मार्गावर एकूण 32 मुख्य पूल आहेत. तर 317 लहान पूल या महामार्गावर बांधण्यात आले आहेत. 59 ओव्हरपास आणि 269 अंडरपास या महामार्गावर आहेत. यात एकूण सात मोठे भुयारी मार्ग आहेत. त्यात इगतपुरी ते आमणे हा सर्वात मोठा आठ किलोमीटर लांबीचा देशातील सर्वात मोठा रुंदीचा भुयारी मार्ग आहे. या महामार्गावर एकूण 25 एंटर चेंजेस आपल्याला पाहायला मिळतात, अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं दिली.

असं काम करते अग्निशमन यंत्रणा : या भुयारी मार्गाचं तापमान 60 अंश सेल्सिअसहून अधिक झाल्यास तापमान नियंत्रणासाठी उच्च दाबाच्या पाण्याच्या धुक्याची व्यवस्था देण्यात आली आहे. याचा अर्थ असा की आग लागल्यास बोगद्यात बसवलेल्या पाईपमधून पाणी आपोआप पडू लागते. जेव्हा तापमान 30 अंश सेल्सिअस होईल, तेव्हा हे पाणी आपोआप बंद होईल. त्यामुळं भुयारी मार्गात एखादी आग लागल्यास आगीवर तात्काळ नियंत्रण मिळवता येणार आहे. आगीवर नियंत्रण मिळवल्यावर ही अग्निशमन यंत्रणा आपोआप बंद होणार आहे. त्यामुळं हा देशातील पहिला स्मार्ट भुयारी मार्ग म्हणूनदेखील ओळखला जातो.

आपत्कालीन परिस्थितीत अनेक सुविधांचा वापर करता येणार : हा भुयारी मार्गात स्वयंचलित अग्निशमन यंत्रणेव्यतिरिक्त, दर 150 मीटरवर फोन बसवण्यात आले आहेत. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत याचा वापर करता येणार आहे. सोबतच दर 30 मीटर अंतरावर स्पीकर्सदेखील बसवण्यात आले आहेत. बोगद्यात एकूण 26 फायर अलार्म सिस्टीमदेखील बसवण्यात आल्या आहेत. या बोगद्यात अॅक्सेस कंट्रोल सिस्टीम आहे. यामध्ये रेडिओ कम्युनिकेशन सिस्टीम आणि सीसीटीव्हीदेखील बसवण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं दिली आहे.



हेही वाचा :