कोल्हापूर : गेल्या विधानसभा निवडणुकीत मिळालेलं यश-अपयश बाजूला सारून आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्ष तयारी लागले आहेत. दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वराज्य पक्ष लढवणार की नाही, हे अद्याप ठरवलेलं नाही, असं माजी खासदार आणि स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी स्पष्ट केलं आहे. ते आज कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.
सध्याच्या घडीला राजकारण हा पैशाचा खेळ : संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, "विधानसभा निवडणुकीत इतके फटके बसले आहेत की, त्यातून बाहेर पडणं अवघड आहे. त्यामुळं स्वराज्य पक्षानं निवडणूक लढवणं असं काही अद्याप ठरवलेलं नाही. आमच्याकडून ज्या काही चुका झाल्या, त्या दुरुस्त करू आणि निवडणूक लढवण्यापेक्षा लोकांना आपल्याकडून काय अपेक्षा आहेत, हे जाणून घेऊ. सध्या प्रामाणिकपणे राजकीय पक्ष चालवणं आजच्या घडीला अवघड झालं आहे. सध्याच्या घडीला राजकारण हा पैशाचा खेळ झाला आहे. पक्ष संघटन सांभाळणं सोपं नाही, खूप अवघड काम आहे," असं संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितलं.
मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालावं : गेल्या काही महिन्यात चर्चेत असलेल्या बीड जिल्ह्यात आज देखील मोठ्या प्रमाणात गुन्हे घडत आहेत. या संदर्भात बोलताना संभाजीराजे छत्रपती यांनी सरकारला खडेबोल सुनावले. "वाल्मिकी कराडला जेलमध्ये घातल्यानंतरही कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत झाला असं म्हणता येणार नाही. अद्यापही कायदा आणि सुव्यवस्था बिघडलेली आहे. आणि हे सुसंस्कृत महाराष्ट्राला परवडणार नाही. महाराष्ट्रात अशा गोष्टी चालू न देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालावं. कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी विशेष लक्ष त्यांनी घालावं," असं संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे.
नागरिकांचा गैरसमज दूर करायला हवा : याचबरोबर, कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळगडाची जागतिक वारसा स्थळांमध्ये नोंद होणार आहे. मात्र याला स्थानिकांचा मोठ्या प्रमाणात विरोध आहे. यासंदर्भात संभाजीराजे छत्रपती म्हणाले, "स्थानिक नागरिकांमध्ये काही गैरसमज झाले आहेत. राज्यातील सर्व किल्ल्यांपैकी सर्वांत जास्त लोकवस्ती असलेला पन्हाळगड आहे. मी गेल्या वेळेस देखील सांगितलं होतं की, जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिकांसोबत बैठक लावावी. तसंच, जर पन्हाळगड जागतिक वारसा स्थळांमध्ये गेला तर आमची घरं जातील, याची भीती आणि गैरसमज तेथील नागरिकांमध्ये आहे. हा गैरसमज दूर करायला हवा. एकदा पन्हाळगड जागतिक वारसा स्थळांमध्ये नोंद झाला तर जग पातळीवर पन्हाळगडाचं नाव होईल," असं संभाजीराजे छत्रपती यावेळी म्हणाले.
हेही वाचा :