मुंबई : बॉलीवूड अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. वरळी वाहतूक नियंत्रण कक्षाला सलमान खानवर हल्ला करणार असल्याचा मेसेज आला होता. यानंतर मुंबई पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत या प्रकरणाचा सखोल तपास करून २४ तासांच्या आत सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या तरुणाला शोधून काढलं आहे.
धमकी देणारा तरूण मानसिक आजारी : अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देणारी व्यक्ती गुजरातमधील वडोदरा जिल्ह्यातील आहे. ही व्यक्ती मानसिक आजारी आहे. हा तरुण गुजरातमधील वडोदरा जिल्ह्यातील वाघोडिया या गावाचा रहिवासी असल्याचं तपासात स्पष्ट झालं आहे. परंतु, अद्याप या तरुणाला अटक केलेली नाही. तपासानंतर २६ वर्षीय तरुणाला नोटीस पाठवून मुंबई पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश दिलेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.
सलमानच्या घराबाहेर कडेकोट सुरक्षा : मुंबई वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सअप क्रमांकावर रविवारी एक संदेश आला होता. यात अभिनेता सलमान खानला घरात घुसून जीवे मारण्याची आणि सलमानची गाडी बॉम्बनं उडवण्याची धमकी देण्यात आली होती. मुंबईतील वरळी पोलिसांनी या प्रकरणी तातडीनं गुन्हा दाखल करत सखोल चौकशी केली. या धमकीच्या संदेशानंतर वरळी पोलिसांनी तातडीनं गुन्ह्याची नोंद केली. तसंच सलमानच्या वांद्रे इथल्या निवासस्थानाबाहेरील सुरक्षा व्यवस्था अधिक कडेकोट करण्यात आली.
सलमानला वाय प्लस सुरक्षा : सलमान खानला जीवे मारण्याची धमकीचा संदेश आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान हा संदेश वडोदरा इथल्या वाघोडिया गावातील व्यक्तीनं पाठवल्याचं स्पष्ट झालं. वडोदरा पोलिसांनी मुंबई पोलिसांच्या तपास पथकासोबत वाघोडिया गावातील तरुणाच्या घरी धाव घेत त्या तरुणाचा तपास सुरू केला. त्यावेळी हा तरुण मानसिक रोगी असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याचं समोर आलं. प्रकरणाच्या चौकशीसाठी गरज भासेल त्यावेळी मुंबईत हजर राहावं, अशी नोटीस मुंबई पोलिसांनी त्या तरूणाला दिली आहे. सध्या सलमान खानला मुंबई पोलिसांची वाय प्लस श्रेणीतील सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली आहे," अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक रोहन आनंद यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
सलमानच्या निवासस्थानाला बुलेट प्रुफ काचेचं आच्छादन : सलमान खानच्या निवासस्थानाबाहेर झालेल्या गोळीबाराची घटना घडली होती. यानंतर नवी मुंबई पोलिसांनी सलमानच्या पनवेल इथल्या फार्म हाऊसची रेकी केलेल्या एका गटाला अटक केली होती. बिश्नोई गँगच्या या आरोपींकडून सलमानच्या फार्महाऊसवर हल्ला करण्याचा प्रयत्न असल्याचा दावा पोलिसांनी त्यावेळी केला होता. गोळीबारीच्या घटनेनंतर सलमान खानचे वास्तव्य असलेल्या निवासस्थानाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला. निवासस्थानाला बुलेट प्रुफ काचेचं आच्छादन करण्यात आलंय.
हेही वाचा :