शिर्डी : शिर्डीचे साईबाबा (Shirdi Sai Baba) देवस्थान हे देश-विदेशातील कोट्यवधी साईभक्तांसाठी श्रद्धेचं आणि आस्थेचं स्थान आहे. जगभरातील कोट्यवधी साईभक्त दरवर्षी साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत येत असतात. आता, मात्र साक्षात साईबाबांच्या मूळ 'चर्म पादुका' महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडूतील विविध शहरांमध्ये भाविकांना दर्शनासाठी उपलब्ध होणार आहेत. शिर्डी साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उपकार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते सहपत्नीक साईबाबांच्या मूळ चर्म पादुकांची विधिवत पूजा करून चर्म पादुका दौऱ्याची आजपासून सुरुवात करण्यात आलीय.
आज सकाळी साईबाबांच्या मूळ चर्म पादुका साईंच्या समाधीवर ठेऊन 'शिर्डी माझे पंढरपूर' ही छोटी आरती पार पडली. यानंतर वाजतगाजत साईबाबांच्या मूळ चर्म पादुकांची समाधी मंदिरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक साईंच्या चावडी, द्वारकमाई आणि गुरुस्थान मंदिरात नेण्यात आल्यानंतर चर्म पादुकांची शिर्डी साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर आणि उप कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांच्या हस्ते सहपत्नीक विधिवत पूजा करण्यात आली. साईंबाबांच्या 'चर्म पादुका' दौऱ्यासाठी एक स्पेशल वोल्वो गाडी संस्थानकडून ठेवण्यात आलीय. या गाडीमध्ये चर्म पादुका ठेवण्यात आल्यानंतर गाडीची विविधत पूजा करून गाडी दौऱ्याकडं रवाना करण्यात आलीय.
असा असणार साई 'चर्म पादुका' दौरा : 10 ते 13 एप्रिल पर्यंत महाराष्ट्रातील सांगली शहर आणि जिल्ह्यातील पेठ वडगाव येथे भाविकांना दर्शनासाठी साईंच्या मूळ चरण पादुका उपलब्ध असणार आहे. 14 ते 18 एप्रिलपर्यंत कर्नाटक राज्यातील दावनगेरे, मल्लेश्वरम येथे सहा दिवस साईबाबांच्या पादुका भाविकांना दर्शनासाठी असणार आहे. यानंतर 19 एप्रिल रोजी सायंकाळी पादुका तामिळनाडूकडं रवाना होतील. 19 ते 26 एप्रिलपर्यंत तामिळनाडू राज्यातील सेलम, करूर, पुलीयमपट्टी, धर्मापुरी येथे साईंच्या पादुका भाविकांना दर्शनासाठी उपलब्ध असणार असून धर्मापुरी येथून 26 एप्रिल रोजी संध्याकाळी या पादुका पुन्हा शिर्डीकडं रवाना होणार आहेत. असा तब्बल 2776 किलोमीटरचा साईंच्या मूळ चर्म पादुकांचा दौरा असणार आहे.
हेही वाचा -