ETV Bharat / state

"शेतकरी कर्जमाफीची हीच ती वेळ"; आमदार रोहित पवारांचा सरकारला सल्ला

मराठवाड्यात अतिवृष्टीमुळं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळं सरकारनं लवकर मदत करावी, अशी मागणी करत आमदार रोहित पवार यांनी केली आहे.

ROHIT PAWAR ON GOVERNMENT
माध्यमांशी बोलताना आमदार रोहित पवार (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : October 1, 2025 at 4:09 PM IST

|

Updated : October 1, 2025 at 6:34 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यासह राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळं सरकारनं लवकरात लवकर नुकसान झालेल्या नागरिकांना आणि शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे.

...तर छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलन करणार : "मागील काही दिवसांत 60 लाख हेक्टरचं अतिवृष्टीमुळं नुकसान झालं आहे. 50 टक्के नुकसान मराठवाड्यामध्ये झालं आहे. तसंच छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठं नुकसान झालं आहे. आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना भेटून लोकांच्या अडचणी सांगितल्या. सरसकट पंचनामे करा, खरडलेल्या जमिनीसाठी वेगळा निधी द्यावा, विद्यार्थी शाळा हॉस्टेलची फी माफ करावी, अशी आमची मागणी आहे. मागण्या मान्य झाल्या नाही तर मराठवाड्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलन करणार," अशी घोषणा आमदार रोहित पवार यांनी केली.

शेतकऱ्यांना तातडीनं मदत करावी : "शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी हीच ती वेळ आहे, मात्र शासन अजून झोपलं आहे," असं म्हणत आमदार रोहित पवार यांनी सरकारवर टीका केली. "मुख्यमंत्र्यांनी दुटप्पी भूमिका घेतली आहे. अजित पवार, देवेंद्र फडणवीस विरोधी पक्ष नेते असताना त्यावेळी म्हणायचे की ओला दुष्काळ जाहीर करा. आता वेळ आल्यावर तुम्ही काहीही करत नाही. त्यांनी काढलेले पीकविमा निकष काढले नसते तर शेतकऱ्यांना मदत मिळाली असती. त्यात ग्रामीण भागाची वाहिनी असलेल्या एसटी बस म्हणजेच लालपरीची दरवाढ म्हणजे दुष्काळात तेरावा महिना आहे. एकीकडं मदत करायची नाही आणि दुसरीकडं त्रास द्यायचा... ही दरवाढ मागे घ्यावी, अशी आमची मागणी आहे," असं आमदार पवार यांनी सांगितलं.

माध्यमांशी बोलताना आमदार रोहित पवार (ETV Bharat Reporter)

ओला दुष्काळ जाहीर करा : "ओला दुष्काळ हा शब्द अस्तित्वात नाही, तर विरोधी पक्ष नेते असताना का आपण मागत होते, याचंही उत्तर द्या. महाराष्ट्राला 8 हजार कोटी ताबडतोब मदत करा, दुजाभाव करू नका, गुजरातला एक न्याय आणि महाराष्ट्राला एक न्याय, असं केंद्रानं करू नये. महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या करतोय. देशातील 40 टक्के आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या आहेत. याकडं राज्यकर्ते दुर्लक्ष करत आहेत. राज्यातील शेतकरी अडचणीत आहे," अशी टीका आमदार रोहित पवार यांनी केली.

पडळकर पातळी सोडून बोलत आहेत : "गोपीचंद पडळकर पातळी सोडून बोलतात. आध्यात्मिक जागेवरून ते असं बोलतात. दोन गोष्टी स्पष्ट आहेत. मुख्यमंत्री फडणवीसांनी आमदार पडळकरांना सांगूनही ते ऐकत नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फक्त बहुजन नेत्यांना खालच्या स्तरावर जाऊन भाषण करण्यासाठी वापरून घेतात. अशा भाषणाचा निषेध आहे. अशा लोकांना काय बोलायचं कळत नाही. त्या माणसाकडून काय अपेक्षा करायची. देवेंद्र स्वतः स्वच्छ राहतात आणि या बहुजन नेत्यांकडून काहीही बोलवून घेतात. पडळकर मंगळसूत्र चोर आहे, असं कुणी बोललं नव्हतं. त्यांनी अंगावर घेतलं. या छोट्या-मोठ्या नेत्यांना तुम्ही नियंत्रित करणार असाल तर महाराष्ट्र माफ करणार नाही. मुख्यमंत्र्यांनी सांगावं की आमदार पडळकर माझं ऐकत नाहीत," अशी टीका आमदार रोहित पवार यांनी केली.

अनिल देशमुख यांना पाठिंबा : "पोलीस प्रशासनावर सत्ताधारी यांचा दबाव आहे म्हणून हा अनिल देशमुख यांच्यावर हल्ला झाला नाही. असा अहवाल आलाय. अनिल देशमुख आणि तिथं असणाऱ्या लोकांना सत्य विचारावं. खरंच हल्ला झाला होता. आमचा अनिल देशमुख यांना पाठिंबा राहील," असं रोहित पवार यांनी स्पष्ट केलं. तसंच "पूर परिस्थिती अतिवृष्टीमुळं सगळ्या समाजाचे शेतकरी अडचणीत आलेत. लोक म्हणतात आम्हाला समाजात वाटू नका, आम्हाला मदत द्या. राजकारण करण्यासाठी कोण तर दोन समाजातील लोकांना भडकवण्याचं काम करत आहे," असं म्हणत रोहित पवारांनी टीका केली.

हेही वाचा :

  1. "भिवंडीत मराठीची गरज काय?" अबू आझमींचं वादग्रस्त वक्तव्य; मनसेचं जोरदार प्रत्युत्तर!
  2. अनिल देशमुख यांच्या गाडीवर दगडफेक झालीच नाही; नागपूर ग्रामीण पोलिसांचा अहवाल कोर्टात सादर
  3. कोल्हापुरात अग्निशमनच्या नूतन इमारतीचा स्लॅब कोसळून मोठी दुर्घटना; एक कामगार ठार, पाच जखमी
Last Updated : October 1, 2025 at 6:34 PM IST