मुंबई - मुख्यमंत्री कार्यालयात माजी सनदी अधिकारी प्रवीण परदेशी यांची मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार या पदावर झालेली नियुक्ती वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कर्जत जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार यांनी या नियुक्तीवर टीका केली आहे. परदेशी यांची मुख्य आर्थिक सल्लागार पदावर नियुक्ती म्हणजे अजित पवारांच्या नेतृत्वाखालील अर्थ विभागावर झालेले अतिक्रमण आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.
प्रवीण परदेशी यांची नुकतीच मुख्यमंत्री कार्यालयात मुख्य आर्थिक सल्लागार या नव्याने निर्मिती केलेल्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा देण्यात आला आहे. व्हिजन 2047 रोड मॅप यासाठी तयारी करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. दर तीन महिन्यांनी ते राज्याच्या अर्थ विभागावर आपला अहवाल सादर करतील. इलेक्ट्रिक व्हेईकल्स, सूक्ष्म लघु व मधम उद्योग तसेच ग्रीन एनर्जी याबाबत ते नीती आयोगासोबत धोरणात्मक विकासाच्या पुढाकाराबाबत समन्वय साधतील, असे जाहीर करण्यात आले आहे.
आमदार रोहित पवार यांनी या नियुक्तीवर जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार या पदाची निर्मिती केली. त्यावर प्रवीण परदेशी या त्यांच्या मर्जीतील अधिकाऱ्याची नियुक्ती केली. त्यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा देऊन अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील अर्थ विभागाचे अधिकार संकुचित केले आहेत, अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे. या नियुक्तीमुळे आगामी काळात अर्थ खात्याचे धोरणात्मक निर्णय तसेच प्रशासकीय निर्णय याच्यावर या पदाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांचे थेट नियंत्रण राहील, असे पवार म्हणाले. यापूर्वी एकनाथ शिंदेंच्या काळात घेण्यात आलेल्या निर्णयाचा आढावा घेतला होता, आता अजित पवार यांच्या विभागावर लक्ष ठेवण्यासाठी त्यांना नियुक्त करण्यात आले आहे, असा आरोपही रोहित पवार यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या मंत्री मंडळातील सर्वच मंत्र्यांच्या खात्यांवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष नियंत्रण मिळवण्यासाठी विविध माध्यमातून प्रयत्नशील आहेत, असा आरोप पवारांनी केला.
लोकशाहीत अधिकारांचे विकेंद्रीकरण गरजेचे आहे तसंच सामूहिक निर्णय घेतल्याने अधिक चांगल्या प्रकारे निकाल येऊ शकतात. मात्र मुख्यमंत्री फडणवीस हे या प्रकाराला बदलून अधिकाऱ्यांचे केंद्रीकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत ही त्यांची स्टाईल आहे, असा आरोप रोहित पवार यांनी केला. भाजपाकडून त्यांच्या मित्र पक्षांचा वापर करून फेकून देण्याच्या यूज अँड थ्रो धोरणावरही त्यांनी टीका केली. भाजपाच्या डिक्शनरीमध्ये मित्रपक्ष केवळ त्यांच्या लाभापर्यंत उपयुक्त असतात एकदा त्यांची उपयुक्तता संपुष्टात आली की त्यांना ते आपल्यापासून दूर करतात अशी त्यांनी टीका केली. भाजपाच्या मित्र पक्षांना त्यांची शिकार होईपर्यंत त्यांची शिकार होत असल्याचं लक्षात येत नाही, हे दुर्दैवी आहे असेही रोहित पवार म्हणाले.
हेही वाचा...