नाशिक : नाशिक रोड परिसरात निवृत्त मुख्याध्यापकानं आपल्या आजारी पत्नीची हत्या करून स्वतः आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे, या दाम्पत्याचे दोन्ही मुलं मुंबई येथे चांगल्या पदावर कार्यरत आहेत. याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
आत्महत्या करण्यापूर्वी लिहिली होती चिठ्ठी : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक रोड, सावरकर नगर भागात निवृत्त मुख्याध्यापक मुरलीधर जोशी (वय 78) हे आपल्या निवृत्त शिक्षिका असलेल्या लता जोशी यांच्यासोबत राहत होते. त्यांची दोन मुले मुंबई येथे उच्चपदस्थ अधिकारी म्हणून काम करत आहेत. मुरलीधर जोशी यांच्या पत्नी लता या 2017 पासून मेंदू विकारामुळं त्रस्त होत्या. त्या काही दिवस हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटरवर होत्या. त्यातून त्या बाहेरही आल्या. मात्र, वारंवार होणाऱ्या आजारपणाला हे दाम्पत्य कंटाळले होते. 9 एप्रिलला संध्याकाळच्या सुमारास निवृत्त मुख्याध्यापक मुरलीधर जोशी यांनी पत्नी लताची हत्या करून तिला कायमस्वरूपी आजारपणापासून मुक्त केलं. नंतर स्वतः आत्महत्या केली. हे करण्यापूर्वी मुरलीधर जोशी यांनी चिठ्ठी लिहून ठेवली होती.
पत्नीला स्वर्गलोकी पाठवत मी... : आजारपणाला कंटाळून पत्नीची हत्या करून स्वतः आत्महत्या करणाऱ्या जोशी यांनी चिठ्ठी लिहिली आहे. "पत्नी लतावर माझं खूप प्रेम आहे. ती आजारपणामुळं अंथरुणावर खिळून पडली होती. त्यामुळं माझ्या पत्नीला मी स्वर्गलोकी पाठवलं आणि त्यानंतर मी तिच्यासोबत जात आहे. आमच्या मरणास कोणासही कारणीभूत ठरवू नये", असं मुरलीधर जोशी यांनी चिठ्ठीत लिहून ठेवलं असल्याचं उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी सागितलं. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
हेही वाचा -
- धक्कादायक ! मोबाईलचं वेड बेतलं जीवावर : मोबाईलवर गेम खेळण्यास मनाई केल्याच्या रागातून विद्यार्थ्याची आत्महत्या
- गुढीपाडव्याला कुटुंब जाणार होते नव्या घरात, त्यापूर्वीच विवाहितनं केली आत्महत्या, सासूची रवानगी येरवडा तुरुंगात
- पॅरोलवर असलेल्या प्रियकराची 'लिव्ह इन रिलेशन'मध्ये असणाऱ्या प्रेयसीसोबत आत्महत्या