पुणे : 'स्वच्छ पुणे, सुंदर पुणे' हे आपण ऐकत असतो आणि पुण्यातील वेगवेगळ्या रस्त्यांवर हे लिहिलेलं आपल्याला पाहायला देखील मिळते. मात्र, असं असलं तरी स्वच्छ पुणे, सुंदर पुण्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. पुण्यातील कोथरुड येथील नावाजलेल्या 'यशवंतराव चव्हाण नाट्यगृह' इथं एका नाटकाचा प्रयोग सुरू असतानाच एका महिला प्रेक्षकाच्या कपड्यांमध्ये उंदीर शिरला आणि या उंदरानं चावा घेतल्यानं त्या महिलेला इंजेक्शन घ्यावं लागलं आहे. या घटनेमुळं सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
महिलेच्या साडीत शिरला उंदीर : कोथरुड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात शनिवारी रात्री ९.३० वाजता एका नाटकाचा प्रयोग सुरू होता. प्रयोग सुरू होऊन दहा ते पंधरा मिनिटे झाले असतानाच एका महिला प्रेक्षकाच्या कपड्यांमध्ये उंदीर शिरला. मात्र, या महिलेनं प्रसंगावधान दाखवत कोणताही गोंधळ न करता नाट्यगृहाच्या बाहेर येत स्वच्छतागृहाकडं धाव घेतली. हा उंदीर बाहेर काढण्यासाठी पंधरा ते वीस मिनिटे गेल्यानंतर त्या महिलेनं नाटक पाहण्यासाठी नाट्यगृहात न जाता थेट घरी जाण्याचा निर्णय घेतला. उंदराची नखं लागल्यामुळं संबंधित महिलेनं डॉक्टरांकडून इंजेक्शन सुद्धा घेतलं आहे. याबाबत महापालिकेच्या सांस्कृतिक विभागाचे उपायुक्त यांनी आज तातडीची बैठक बोलवून थेट यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाला भेट दिली आहे.
सदरील घटना अत्यंत गंभीर : याबाबत महापालिकेचे उपायुक्त सुनील बल्लाळ म्हणाले की, "यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात जी काही घटना घडली आहे, ती अत्यंत गंभीर आहे. नाट्यप्रयोग सुरू असताना अशी घटना घडता कामा नये. तसेच कायमस्वरुपी काय उपाययोजना करता येतील, यासाठी सूचना देखील करण्यात आल्या आहेत. शहरातील कोणत्याही नाट्यगृहात अशा घटना घडू नये, यासाठी काळजी घेण्यात येणार आहे."
हेही वाचा -
- Chandrakant Patil: स्मारकांच्या छायाचित्र प्रदर्शनाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन
- Theatres in Pune : पुणे तेथे नाट्यगृह उणे... 'ईटीव्ही भारत' चा स्पेशल रिपोर्ट
- कोल्हापूरचा 'सांस्कृतिक ठेवा' आगीच्या भक्ष्यस्थानी, संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण आग - Keshavrao Bhosale Theatre Fir