राज ठाकरे सहकुटुंब स्नेहभोजनाकरिता मातोश्रीवर, राजकीय चर्चांना सुरुवात
राज ठाकरे कोणत्या कारणास्तवर स्नेहभोजनासाठी मातोश्रीवर दाखल झालेत हे अद्याप समोर आले नसले तरी शिवसेना-मनसे युतीबाबत दोन भावंडांमध्ये जोरदार राजकीय खलबतं सुरू असल्याचं म्हटलं जातंय.

Published : October 12, 2025 at 4:37 PM IST
मुंबई – आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावरच ठाकरे बंधूंचे परिवार मिलन झाले आणि आता या दोन भावंडांच्या भेटीगाठी वाढू लागल्या आहेत. आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्नेहभोजनासाठी मातोश्रीवर दाखल झाले असून, या स्नेह भोजनाच्या निमित्ताने दोन भावांमध्ये काही राजकीय चर्चा होतात का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज ठाकरे कोणत्या कौटुंबिक कार्यक्रमाच्या निमित्ताने स्नेहभोजनासाठी मातोश्रीवर दाखल झाले आहेत हे अद्याप समोर आले नसले तरी शिवसेना-मनसे युतीबाबत दोन भावंडांमध्ये जोरदार राजकीय खलबतं सुरू असल्याचं म्हटलं जातंय.
शिवसेना-मनसे संभाव्य युतीच्या चर्चा : विशेष म्हणजे आजच्या स्नेहभोजनासाठी राज ठाकरे यांच्या सोबत त्यांच्या मातोश्री कुंदा ठाकरे, राज ठाकरे यांची बहीण जयवंती देशपांडे आणि त्यांचे पती अभय देशपांडे हे उपस्थित असल्याचं म्हटलं जात आहे. मातोश्रीच्या गेटवर दाखल होताच माध्यमांनी राज ठाकरेंच्या गाडीला घेराव घातला आणि आजच्या मातोश्री भेटीमागचे कारण विचारले. त्यावर राज ठाकरेंनी कौटुंबिक भेट असल्याचे सांगत ‘माझी आई देखील सोबत आहे. यात राजकीय काही नाही,’ अशी प्रतिक्रिया माध्यमांना दिली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-मनसे संभाव्य युतीच्या चर्चेदरम्यान या भेटीमुळे दोन भावांमध्ये राजकीय चर्चा होतात का? याकडे सर्वांचे लक्ष लागलंय.
दोन्ही बंधू कार्यक्रमांच्या निमित्ताने सार्वजनिक व्यासपीठांवर एकत्र : वरळी येथे झालेल्या मराठी मेळाव्यानंतर दोन्ही नेते विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने सार्वजनिक व्यासपीठांवर एकत्र आलेले दिसले. सुरुवातीला हे दोन भाऊ 5 जुलै रोजी वरळी डोम येथे हिंदी सक्ती विरोधातील कार्यक्रमात एकत्र आले. त्याच महिन्याच्या अखेरीस राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या 65 व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर उपस्थिती लावली होती. पुढे ऑगस्टमध्ये गणपती उत्सवादरम्यान उद्धव यांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले होते. पुढे या भेटी होत राहिल्या. मात्र, त्याला स्नेहभोजनाचा तडका हा संजय राऊत यांच्या नातीच्या बारशाच्या निमित्ताने मिळाला.
भेटीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चर्चा : 5 ऑक्टोबर रोजी संजय राऊत यांच्या नातीचं बारसं झालंय. या बारशाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे राऊत यांच्या मैत्री बंगल्यावर एकत्र आले होते. या कौटुंबिक कार्यक्रमानंतर दोन्ही ठाकरे बंधू थेट मातोश्रीवर गेले. राज आणि उद्धव ठाकरे अचानक मातोश्रीवर दाखल झाल्याने विविध चर्चा सुरू झाल्या. या चर्चा सुरू असतानाच दुसऱ्या दिवशी म्हणजे 6 ऑक्टोबर रोजी खासदार संजय राऊत या दोन्ही भावांमध्ये महत्त्वाच्या राजकीय विषयावर चर्चा झाल्याचं सांगितलं. त्यामुळे आजची भेटदेखील सध्या कौटुंबिक असल्याचे सांगितलं जात असलं तरी या भेटीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काही चर्चा होतात का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचाः

