मुंबई : राजकीय विश्वातून एक मोठी बातमी समोर येत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत युतीचे संकेत दिले. महेश मांजरेकर यांना दिलेल्या एका मुलाखतीत राज ठाकरे यांनी ही माहिती दिली. एका मुलाखतीत मांजरेकर यांनी विचारलेल्या प्रश्नावर राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या युतीबाबत भाष्य केलं आहे. राज ठाकरे यांच्या या भूमिकेमुळं राज्याच्या राजकारणात भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज ठाकरे यांच्या या संकेतावर उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात? याकडं सर्वांच लक्ष आहे.
आमच्यातले वाद, भांडण छोटी : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अजूनही एकत्र येऊ शकतात का? असा थेट प्रश्न महेश मांजरेकर यांनी राज ठाकरे यांना मुलाखतीत विचारला. या प्रश्नाला दिलखुलासपणे उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले, "आमच्यातले वाद, भांडण छोटी असून, महाराष्ट्र खूप मोठा आहे. या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी आणि मराठी माणसाच्या हितासाठी ही भांडणं, वाद आणि अन्य सर्व गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत. त्यामुळं एकत्र येणं आणि एकत्र राहणं ही फार काही कठीण गोष्ट आहे, असं मला वाटत नाही. परंतु, विषय फक्त इच्छेचा असून, हा फक्त माझ्या एकट्याच्या इच्छेचा किंवा माझ्या स्वार्थाचा विषय नाही. आपण महाराष्ट्राचा लार्जर पिक्चर पाहणं गरजेचं आहे आणि तो मी पाहतोच."
लहान गोष्टीत मी इगो आणत नाही : "एकनाथ शिंदे यांचं राजकारण वेगळं आणि मी शिवसेनेतून बाहेर पडलो, ते वेगळं. मी शिवसेना सोडली, त्यावेळी आमदार माझ्याकडंही आले होते. हे मलाही (बंड करणं) तेव्हा सहज शक्य होतं, ज्यावेळी मी शिवसेनेत होतो. त्यावेळी उद्धवसोबत काम करायला माझी कोणतीच हरकत नव्हती. परंतु, समोरच्या व्यक्तीच्या मनात आहे का?, मी त्यांच्यासोबत काम करावं ? अशा लहान गोष्टीत मी माझा इगो आणत नाही," असं राज ठाकरे म्हणाले.
हेही वाचा :