शिर्डी : खान्देश म्हटलं की डोळ्यासमोर लगेच येते ती केळी, प्रवरा पट्टा म्हटलं की ऊस. मात्र यावेळी चित्र वेगळंच आहे. ऊसाचं आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहाता तालुक्यातील एका शेतकऱ्यानं पारंपरिक ऊस शेतीला फाटा देत केळीचं उत्पादन घेतलं. त्याची ही केळी थेट इराणच्या बाजारात पोहोचली आहेत. स्थानिक बाजारपेठ पेक्षा चांगला भाव विदेशी बाजार पेठेत मिळाल्यामुळे शेतकऱ्यानं समाधान व्यक्त केलं आहे.

"आज थेट इराणच्या बाजारात माझ्या शेतातील केळी गेल्यामुळे मला स्थानिक बाजारपेठेपेक्षा अधिक दर मिळाला आहे. मात्र फक्त पैशांचीच नाही, तर वेगळ्या शेतीची चर्चा गावातून थेट परदेशात पोहोचली आहे, याचं समाधान फार मोठं आहे. - गणेश विष्णुपंत निबे, केळी उत्पादक शेतकरी
आशिया खंडातील पहिला साखर कारखाना राहाता तालुक्यात : आशिया खंडातील पहिला साखर कारखाना म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो राहाता तालुक्यातील प्रवरानगर इथल्या पूर्वाता प्रवरा आणि नंतर नामकरण केलेला विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना. या प्रवरा पट्ट्यात ऊस शेती प्रामुख्यानं केली जाते. याच पट्ट्यातील प्रवरानदी काठी असलेल्या कोल्हार इथल्या गणेश विष्णुपंत निबे या शेतकऱ्यानं ऊसाच्या शेतीला फाटा देत शेतीत काहीतरी नवीन करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी 2013 साली आपल्या तीन एकर क्षेत्रात केळीची लागवड केली. सुरुवातीला केळीचं उत्पादन सुरु झाल्यानंतर निबे यांनी स्वतः स्थानिक बाजारात जाऊन विक्री केली. समाधानकारक दर मिळू लागले. मात्र केवळ चांगलं उत्पादन एवढंच समाधानकारक नव्हतं, तर त्यांना शेतीची चर्चा व्हावी, नाव राज्यभर व्हावं असं वाटत होतं. म्हणूनच त्यांनी 12 वर्षांच्या अनुभवातून पुन्हा एकदा नवीन उभारी घेतली. त्यांनी केळीची नव्यानं बाग तयार केली. तेव्हाच सुरू झाला नव्या यशाचा अध्याय.

जुनी बाग मोडून तयार केली नवीन बाग : केळीच्या बागेचं सरासरी आयुष्य तीन वर्षांचं असते. या 12 वर्षांत त्यांनी दोन वेळा जुनी बाग मोडून नवीन बाग तयार केली. यंदाही चांगलं उत्पादन मिळालं आहे. त्यांनी सोशल मीडियावर अभ्यास केला. त्यातून लक्षात आलं की वेळेवर पाणी, औषधं, रासायनिक व सेंद्रिय खतांचं योग्य नियोजन केल्यास फळांचं वजन व लांबी वाढते. यानंतर त्यांनी जुनी बाग मोडून 2024 साली पुन्हा तीन एकर क्षेत्रात एच. यू. गुगळे कंपनीच्या जी-9 जातीच्या 4500 केळीच्या रोपांची लागवड 6 बाय 5 फूट अंतरावर केली. या पूर्वीपासून ते याच जातीची लागवड करत आले आहेत. मात्र यंदा फळांवर रोगराई होऊ नये, म्हणून शेणखत व रासायनिक खतांचा संमिश्र वापर केला. जेव्हा झाडांना घड लागले, तेव्हा कीटकनाशक, बुरशीनाशक आणि पोषक द्रव्यांची वेळेवर फवारणी केली.
साडेतीन लाख रुपये झाला खर्च : या वर्षभराच्या व्यवस्थापनासाठी त्यांचा एकूण खर्च सुमारे साडेतीन लाख रुपये झाला. हे पीक फारश्या पाण्याचं नसतानाही वेळेचं काटेकोर नियोजन आवश्यक असतं. त्यांनी ठिबक सिंचनाच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला. यामुळे झाडांची वाढ आणि फळांची गुणवत्ता सुधारली. विशेष म्हणजे यंदा त्यांच्या केळीची लांबी आणि वजन वाढलेलं पाहून निबे यांनी त्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. हे फोटो पाहून जिल्ह्यातील नेवासा येथील एका व्यापाऱ्यानं त्यांच्या बागेला भेट दिली. त्यानंतर 27 टन केळी 20 रुपये किलो दरानं खरेदी करून थेट इराणला निर्यात केली," अशी माहिती निबे यांनी दिली.
पहिल्याच वर्षी 50 टन केळीची कापणी : या पहिल्याच वर्षी 50 टन केळीची कापणी झाली असून अजून 50 टन माल शिल्लक आहे. पुढील 20 दिवसात दुसरी कापणी होणार आहे. यंदा एकूण 100 टनांहून अधिक केळीचं उत्पादन मिळालं आहे. यामध्ये 23 टन केळी स्थानिक बाजारात 11 रुपये किलो दरानं विकली गेली. त्यातून निबे यांना सुमारे अडीच लाख रुपये उत्पन्न मिळालं. तर 27 टन केळी 20 रुपये किलोनं इराणला निर्यात केली असून त्यातून त्यांना साडेपाच लाख रुपये उत्पन्न मिळालं आहे. एकूण 50 टनाच्या उत्पादनातून त्यांना 8 लाख रुपयांहून अधिक उत्पन्न मिळालं असून अजून निम्मा माल कापणीसाठी शिल्लक असल्याचं शेतकरी गणेश विष्णुपंत निबे यांनी सांगितलं आहे. "गेल्या 12 वर्षांपासून केळी शेती करतोय. 12 वर्षात तब्बल 15 लाख रूपये केळी शेतीसाठी खर्च केला. 35 लाख रूपये निव्वळ नफाही मिळाला," असं गणेश विष्णुपंत निबे यांनी यावेळी सांगितलं आहे.
या यशामागं आहे... :
- नवीन काही करण्याची जिद्द
- चांगलं उत्पादन असूनही न थांबण्याची वृत्ती
- वेगळ्या शेतीचा सातत्याने शोध
- सोशल मीडियाचा योग्य वापर
- औषधं, खतं आणि पाण्याचं अचूक व्यवस्थापन.
हे सर्व घटक निबे यांनी शिस्तबद्ध पद्धतीनं आपल्या शेतीत वापरलं. म्हणूनच उसाच्या पट्ट्यातून केळी थेट इराणपर्यंत पोहोचली.
हेही वाचा :