पुणे : पुणे शहरासह राज्यातील इतर भागात मोठ्या प्रमाणावर उन्हाचा चटका जाणवत असून तापमानात मोठी वाढ होताना पाहायला मिळत आहे. याच उन्हाच्या चटक्यामुळे विविध आजार होत असून सध्या पुणे शहरात सर्दी, खोकला आणि तापाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. त्यामुळे याबाबत काळजी घेण्याचे आवाहन ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी पुणेकरांना केले आहे.
उन्हाचा चटका वाढला : ससून रुग्णालयातील डॉ. संजय गायकवाड यांनी सांगितले की, "गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात तापमान वाढलं आहे. उन्हाचा चटका वाढला आहे. यामुळे व्हायरल आजारांचे रुग्ण हे वाढलेले पाहायला मिळत आहे. यामध्ये सर्दी, शिंका येणे, अंग दुखी, खोकला तसेच दम लागणे अशा समस्या असलेले रुग्ण हे वाढलेले पाहायला मिळत आहेत."
तत्काळ रुग्णालयात जाऊन उपचार घ्या : याचबरोबर, "नागरिकांना आवाहन आहे की, उन्हाचा चटका हा वाढला असून कडक उन्हात जाताना काळजी घेतली पाहिजे. तसेच व्हायरल इंफेक्शनचा धोका असल्याने गर्दीत जाताना काळजी घेतली पाहिजे. याशिवाय, या आजारांच्याबाबत काही लक्षणे आढळल्यास तत्काळ आपल्या जवळच्या रुग्णालयात जाऊन लोकांनी उपचार घ्यावेत", असे आवाहन सुद्धा यावेळी डॉ. संजय गायकवाड यांनी केले आहे.
...अन्यथा उन्हात जाणे टाळावे : दरम्यान, राज्यातील विविध ठिकाणी उन्हाचा पारा हा वाढला असून अनेक ठिकाणी उन्हाचे चटके सुद्धा जाणवत असल्याचे पाहायला मिळत आहे. असे असताना नागरिकांनी पाण्याची बॉटल तसेच उन्हात जाताना छत्री घ्यावी आणि काम असेल तर बाहेर पडावे, अन्यथा उन्हात जाणे टाळावे, असे आवाहन देखील यावेळी डॉ. संजय गायकवाड यांनी केले आहे.
हेही वाचा :