पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात दीनानाथ रुग्णालय प्रकरणाची (Deenanath Mangeshkar Hospital) जोरदार चर्चा होत आहे. अशातच आता पुणे महापालिकेकडून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला मिळकतकर वसुलीसाठी नोटीस पाठवण्यात आली आहे. दोन दिवसात थकबाकी भरा अन्यथा पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा महापालिकेकडून देण्यात आला आहे.
मंगेशकर रुग्णालयाला पाठवली नोटीस : दीनानाथ रुग्णालयाकडून महापालिकेची 27 कोटींची थकबाकी असून, गेल्या काही वर्षांपासून ही रक्कम भरण्यात आलेली नाही. दीनानाथ रुग्णालय धर्मादाय रुग्णालय असून, त्याला सूट मिळावी म्हणून रुग्णालयाकडून या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेण्यात आली होती. मात्र, आता महापालिकेकडून दीनानाथ रुग्णालयाला नोटीस काढून कोर्टाच्या आदेशानुसार थकबाकी दोन दिवसांत भरण्यात यावी अन्यथा कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.


2 दिवसांत रक्कम भरावी अन्यथा होणार कारवाई : महापालिकेने काढलेल्या नोटीसमध्ये म्हटलं आहे की, पुणे पेठ एरंडवणा, स. नं. 8+13/2 या मिळकतीचे कर आकरणी रजिस्टरी मालक म्हणून लता मंगेशकर मेडिकल फाऊंडेशन या नावाची नोंद असून, मिळकतीची वर्ष 2024-25 अखेर थकबाकी रक्कम 27,38,62,874 रुपये इतकी आहे. वर्ष 2016-17 रोजी मिळकतीची करण्यात आलेली कर आकारणी आपणास मान्य नसल्याने पुणे महानगरपालिका विरुद्ध आपण दावा दाखल केलेला होता. सदर दाव्याबाबत उच्च न्यायालयाने संदर्भ क्र. 1 अन्वये, मिळकत करात समाविष्ट असलेल्या जनरल टॅक्सच्या 50 टक्के रक्कम + उर्वरित इतर कर भरणेबाबत कोर्ट आदेश दिले आहेत. त्यानुसार आपणाकडे वर्ष 2014 ते वर्ष 2025 अखेर 22,06,76,081 रुपये इतकी थकबाकी कोर्ट आदेशानुसार दिसून येत आहे. या थकबाकीबाबत महापालिका आयुक्त यांचे दालनात बैठक झाली असून, अतिरिक्त महापालिका आयुक्त असता या मिळकतीच्या थकबाकीबाबत आणि कोर्ट आदेशानुसार मिळकतीवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कराधान नियम 42 च्या तरतुदीनुसार जप्तीची कारवाई करण्याबाबत तोंडी आदेश दिलेत. तरी, न्यायालयाच्या आदेशानुसार थकबाकी रक्कम 22,06,76,081 रुपये इतकी रक्कम पत्र मिळताच 2 दिवसांत भरावी अन्यथा पुढील कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असं पत्र महापालिकेकडून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला देण्यात आला आहे.
हेही वाचा -