पुणे : पुण्यातील दीनानाथ रुग्णालयातील तनिषा भिसे यांना मागितलेल्या दहा लाख रुपये अँडव्हान्स प्रकरणानंतर आता पुणे महापालिकेकडून शहरातील ८५० खाजगी रुग्णालयांना नोटीस पाठवण्यात आली आहे. दरम्यान, रुग्णालयात येणाऱ्या रुग्णाकडून तातडीच्या उपचारांसाठी अनामत रक्कम घेऊ नये, असं खासगी रुग्णालयांना पाठवलेल्या नोटीसमध्ये म्हटलं आहे.
महापालिकेच्या भूमिकेमुळं रुग्णांना दिलासा मिळणार : दीनानाथ रुग्णालयातील प्रकरणानंतर पुणे महापालिकेनं शहरातील सर्व खासगी रुग्णालयांना रुग्णांवरील तातडीच्या उपचारांसंदर्भात नोटीस पाठविली आहे. तातडीच्या उपचारांची गरज असलेल्या रूग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांकडून अनामत रक्कम घेऊ नये. रुग्णांवर पहिल्यांदा उपचार करण्यास प्राधान्य द्यावं, असं महापालिकेनं रुग्णालयांना पाठविलेल्या नोटीसमध्ये नमूद केलंय. महापालिकेच्या या भूमिकेमुळं रुग्णांना दिलासा मिळणार आहे.
रुग्णालयावर कारवाईची मागणी : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये तातडीचे उपचार न केल्यानं तनिषा भिसे या गरोदर मातेच्या मृत्यूची घटना नुकतीच घडली असून या घटनेनंतर सर्वच स्तरातून रुग्णालयानं मागितलेल्या डिपॉझिट रकमेवरून टीका होत आहे. पैशांच्या मागणीवरून रुग्णाचा जीव गेल्याच्या या घटनेनंतर विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांनी रुग्णालयाच्याविरुद्ध तीव्र आंदोलनं केली. तसंच, रुग्णालयावर कारवाईची मागणी केली जात आहे. रुग्णालयानं या प्रकरणाची दखल घेत तातडीच्या उपचारांसाठी दाखल झालेल्या रुग्णांकडून अनामत रक्कम न घेण्याची भूमिका जाहीर केली.
भविष्यात असं काही आढळल्यास कारवाई : याचबरोबर, या घटनेनंतर पुणे महापालिकेनं आता शहरातील सर्व खासगी रुग्णालयांना नोटीस बजावली आहे. याबाबत महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर म्हणाले की, "द मुंबई नर्सिंग होम अॅक्ट १९४९ नुसार शहरातील जेवढी खासगी रुग्णालये आहेत. त्या सर्व रुग्णालयांना महापालिकेच्या माध्यमातून नोटीस देण्यात आली आहे. रुग्णाला तातडीच्या उपचारांसाठी रुग्णालयानं अनामत रक्कम घेऊ नये, तसंच भविष्यात असं काही आढळल्यास कारवाई देखील करण्यात येणार आहे", असंही डॉ. सूर्यकांत देवकर यांनी सांगितलं.
हेही वाचा :