पुणे : पुणे तिथे, काय उणे... हे आपण नेहेमी म्हणत असतो आणि त्याची प्रचिती आपल्याला विविध माध्यमातून येत असते. पुणेकर हे कुठेही कमी नसून सर्वच क्षेत्रात अव्वल पाहायला मिळतात, मग ते शिक्षण असो की पुणेरी टोमणे असो प्रत्येक क्षेत्रात पुणेकर आपल्याला पुढे असल्याचे पाहायला मिळतील. आता देखील पुणेकरांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. पुण्यातील ऋतुजा वऱ्हाडे हिने राष्ट्रीय संरक्षण अकादमीतर्फे (एनडीए) घेण्यात आलेल्या परीक्षेत मुलींमध्ये देशात पहिला क्रमांक पटकावला असून, ऑल इंडिया रँक ३ मिळवत इतिहास रचला आहे. तिच्या या यशाबद्दल सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
मुलींमध्ये प्रथम क्रमांक : देशातील विविध परीक्षांमध्ये एनडीएची परीक्षा देखील कठीण समजली जाते. यंदाच्या वर्षी ९० जागांसाठी जवळपास दीड लाख मुली या रिंगणात उतरल्या होत्या आणि या दीड लाख मुलींमध्ये ऋतुजा हिने आपलं वेगळेपण सिद्ध करत मुलींमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. ऋतुजा हिचे वडील संदीप वहऱ्हाडे हे वेब डिझाइन प्राध्यापक असून, आई जयश्री वऱ्हाडे या गणिताच्या शिक्षिका आहेत. भारत सरकारने राष्ट्रीय संरक्षण अकादमीचे दरवाजे मुलींसाठी उघडले, तेव्हाच ऋतुजाने या क्षेत्रामध्ये जाण्याचा निश्चय केला होता आणि मग मेहेनत करत तिने हे यश मिळविले आहे.
दोन वर्ष कठोर मेहेनत : यापूर्वी तिने विज्ञान ऑलिम्पियाड आणि राज्यस्तरीय गणित स्पर्धांमध्येदेखील उत्कृष्ट कामगिरी केली आहे. ऋतुजाने या क्षेत्रात प्रवेश केल्यावर दोन वर्ष कठोर मेहेनत केली. यात तिला वायटीए या अकॅडमीचे मार्गदर्शन लाभले. एनडीए परीक्षेत यश मिळवण्यासाठी सुरुवातीला लेखी परीक्षा उत्तीर्ण होणे, त्यानंतर पाच दिवस चालणाऱ्या तोंडी परीक्षेत यश संपादन करणे सोपे नव्हते, तरीही ते ऋतुजाने करून दाखवलं आहे. दरम्यान, ऋतुजा वऱ्हाडे ही लहानपणापासूनच शिक्षणात हुशार असून दहावीत तिला ९८ टक्के मिळाले आहेत.
सीपीएसएस परीक्षेसाठी पात्रता मिळवली : अकरावी आणि बारावीमध्ये असताना तिने एनडीए प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी यशोतेज अकादमी पुणे येथे प्रवेश घेतला आणि एसएसबी तयारीसाठी ती गुरुदेवांच्या अकादमीमध्ये गेली. दरम्यान, ऋतुजा आपल्या यशाचे श्रेय तिच्या पालकांना, शिक्षकांना आणि सर्व वायटीए टीमला देत आहे. ऋतुजाने पहिल्याच प्रयत्नात मुलींमध्ये भारतात पहिला क्रमांक मिळवला आहे. ऋतुजाची बंगळुरू बोर्डाकडून भारतीय सैन्यासाठी शिफारस करण्यात आली. त्यानंतर म्हैसूर बोर्ड (AFSB) कडून सीपीएसएस परीक्षेसाठी पात्रता मिळवली. आता ती एअरफोर्स फ्लाइंग ब्रांचसाठी देखील वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त आहे.
हेही वाचा :