पुणे : पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणी भाजपा महिला आघाडीकडून हॉस्पिटलबाहेर आंदोलन करत, डॉ. घैसास यांच्या आईच्या रुग्णालयाची तोडफोड करण्यात आली होती. या विरोधात खासदार मेधा कुलकर्णी यांनी धीरज घाटे यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली होती. मात्र, शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी महिला मोर्चाची बाजू घेतल्यावर आता मेधा कुलकर्णी याप्रकरणी वरिष्ठांकडे तक्रार करणार आहेत.
काय म्हणाल्या मेधा कुलकर्णी? : खासदार मेधा कुलकर्णी यांनी भाजपा महिला आघाडीकडून डॉ. घैसास यांच्या आईच्या रुग्णालयाची तोडफोड केल्याप्रकरणी नाराजी व्यक्त केली होती. मात्र, सोमवारी शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी महिला मोर्चाची बाजू घेत पक्ष टिकवण्यासाठी आंदोलने करावी लागतात, असं विधान करत महिला मोर्चाची बाजू घेतली होती. यावर खासदार मेधा कुलकर्णी यांना विचारलं असता त्या म्हणाल्या की, "दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमधील आंदोलनाचा आणि डॉ. घैसास यांच्या आई-वडिलांच्या हॉस्पिटलचा काय संबंध आहे? पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं पाहिजे, असे शहराध्यक्ष म्हणतात. पण तुम्ही भलत्याच्या दारात जाऊन आंदोलने करता. सुश्रुत घैसास तिथं राहत नाहीत आणि त्यांचा तो दवाखाना पण नाही. तिथे जाऊन आंदोलन करणं, तोडफोड करणं, वस्तू फेकून देणं, हे चुकीचं आहे. हे आंदोलन त्यांनी शहराच्या अध्यक्षांना विचारून केली नाही. शहानिशा करण्यासाठी आमचे वरिष्ठ समर्थ आहेत. जे काही निष्कर्ष निघतील त्यातून दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनावर कारवाईबाबत निर्णय होईल. दोषी असतील तर कारवाई झालीच पाहिजे. पत्रामध्ये मी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची बाजू घेतलेली नाही आणि याबाबत आत्ता मी वरिष्ठांकडे जाणार आहे."
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची बाजू घेतलेली नाही : त्या पुढे म्हणाल्या की, "दीनानाथ रुग्णालयात अनामत रक्कम घेतली जात नाही, असं मी म्हटलं नाही. तसेच पत्रामध्ये मी दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाची बाजू घेतलेली नाही. आमचे वरिष्ठ सक्षम आहेत, माझा त्यांच्यावर विश्वास आहे. महिला मोर्चाच्या अध्यक्षांच्या आपल्या वरिष्ठांवर विश्वास आहे की नाही? त्यांना आपल्या कार्यपद्धतीवरती विश्वास आहे की नाही? हे माझे प्रश्न आहेत. ज्या डॉक्टरचा त्याच्यामध्ये संबंध नाही, त्यांच्या क्लिनिकमध्ये धुमाकूळ घालणं मला पटलं नाही. जे आंदोलन महिला आघाडीने केलं त्याबद्दल लोकांमध्ये चीड निर्माण झाली आहे. त्याबद्दल आम्ही लोकांना 'सॉरी' म्हणतोय. नागरिकांच्या मनामध्ये जो रोष निर्माण झाला आहे तेवढ्यापुरतंच माझं हे पत्र निगडित आहे. वरिष्ठांच्या न्याय प्रक्रियेवर मला विश्वास आहे. मात्र महिला मोर्चाच्या आहे की नाही हे माहीत नाही. डॉ. घैसास यांच्या आईच्या रुग्णालयाची जी तोडफोड झाली आहे त्याबाबत माझे आक्षेप आहेत."
भाजपामधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर : डॉ. घैसास यांच्या आईच्या रुग्णालयाची भाजपा महिला आघाडीकडून तोडफोड करण्यात आल्यावर खासदार मेधा कुलकर्णी यांनी जाहीर नाराजीृ व्यक्त केली. तर दुसरीकडे या घटनेनंतर भाजपा नेत्या आमदार चित्रा वाघ यांनी या महिलांचं समर्थन देखील केलं होतं. तसेच खासदार मेधा कुलकर्णी यांनी शहराध्यक्ष धीरज घाटे यांना लिहिलेल्या पत्रानंतर देखील शहराध्यक्ष यांनी महिला आघाडीची बाजू घेतल्यावर आत्ता मेधा कुलकर्णी याबाबत वरिष्ठांकडे न्याय मागणार आहेत. पण या संपूर्ण प्रकरणात भाजपामधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे.
हेही वाचा -
- तनिषा भिसे मृत्यू प्रकरण; दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर गुन्हा दाखल झाला पाहिजे - सुप्रिया सुळे
- पुण्यातील मंगेशकर रुग्णालयानं २७ कोटींहून अधिकचा कर थकवला; रुग्णालयावर कारवाई करा, युवक काँग्रेसची मागणी
- भिसे कुटुंबीयांची मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट; दोन्ही मुलींचा उपचारांचा खर्च मुख्यमंत्री सहायता निधीतून करण्यात येणार