शिर्डी : भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी लाखो भाविक दररोज शिर्डीला येत असतात. तसंच आपल्या इच्छेनुसार साईंच्या झोळीत देणगी टाकतात. कोणी पैसे तर कोणी सोनं, चांदी किंवा हिरे हे साईबाबांच्या चरणी अर्पण करत असतात. अशातच पुण्यातील साई भक्त राजेंद्र गारुडकर यांनी बाबांना 55 ग्रॅम वजनाचा साडेपाच लाख रुपयांचा आकर्षक सुवर्ण हार अर्पण केला आहे.
साईंना सुवर्ण हार अर्पण : आयुष्यातील खडतर प्रवास संपावा यासाठी पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील मांजरी येथील राजेंद्र गारुडकर यांनी सहपरिवार साईंना साकडं घातलं होतं. गेल्या अकरा गुरुवारी त्यांनी शिर्डीत साई दरबारी खेटा घातल्या. त्यानंतर आता शेवटच्या गुरुवारी भाविक गारुडकर यांनी सहकुटुंब शिर्डीला येत साईंना सुवर्ण हार अर्पण केलाय. बाबांच्या आशीर्वादानं व्यवसायात वृद्धी झाली. दोन्ही मुलं आणि परिवार सुखी असल्यानं बाबांना ही भेट दिल्याचं दानशूर साईभक्त राजेंद्र गारुडकर यांनी सांगितलं.
शाल, साई मूर्ती देऊन केला सत्कार : दरम्यान, या दानशूर साई भक्त परिवाराचा साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी शाल, साई मूर्ती देऊन सत्कार केला. तसंच भाविकाने देणगी म्हणून आणलेला सुवर्ण हार साईबाबांच्या धुपआरती आधी साईबाबांच्या मूर्तीला घालण्यात आला. यानंतर साईभक्त गारुडकर यांनी साईबाबांच्या समाधीचं मनोभावं दर्शन घेत सुवर्ण हार साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्याकडं सुपूर्त केला.
शिर्डी साईबाबा हॉस्पिटलला देणगी : या आधी अमेरिका आणि हरियाणातील साईभक्त कुटुंबांनी साई चरणी तब्बल 7 लाख 49 हजार रुपयांचं सुवर्ण दान अर्पण केलं होतं. तर गुजरातच्या 'जय साई फाउंडेशन'नं 21 लाख रुपयांची वैद्यकीय उपकरणं शिर्डी साईबाबा हॉस्पिटलला देणगी म्हणून दिली होती.
हेही वाचा -