पुणे - आषाढी पालखी सोहळ्यानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (20 जून) पुणे इथल्या भवानी पेठेतील पालखी विठ्ठल मंदिरात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुकांचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्या हस्ते मंदिरात पालखीची पूजा झाली.
दोन्ही पालख्यांचा आज पुण्यात मुक्काम- 'माऊली, माऊली'चा जयघोष... आणि ग्यानबा माऊली-तुकाराम' चा नामघोष, त्यात टाळ-मृदंगाच्या तालावर होणारा विठूनामाचा गजर... तुळशी वृंदावन आणि दिंड्या-पताका... अशा भक्तिमय वातावरणात जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी भक्तिमय वातावरणात पुण्यनगरीत दाखल झाल्या. आषाढी पालखी सोहळ्यानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भवानी पेठेतील पालखी विठ्ठल मंदिरात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेतलं. मंदिरात त्यांच्या हस्ते पालखीची पूजा झाली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मंदिर समितीच्या वतीने सत्कारही करण्यात आला. या विशेष प्रसंगी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, ज्ञानेश्वर महाराज संस्थांचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, गुरु शांतिनाथ, राजेंद्र उमाप, भावार्थ देखणे, पुरुषोत्तम पाटील, रोहिणी पवार, चैतन्य लोंढे, पालखी विठ्ठल मंदीर संस्थांचे अध्यक्ष तेजेंद्र कोंढरे, विश्वस्त प्रमोद बेंगरूट, शिवाजीराव जगदाळे, गोरख भिकुले आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांनी वारकऱ्यांना दिल्या शुभेच्छा- पुजेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालखीसोबत पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या. त्याआधी विठ्ठल नामाच्या गजरात आणि ज्ञानोबा-तुकारामच्या जयघोषात टाळ मृदुंगाच्या तालावर भक्तिमय वातावरणात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं विठ्ठल मंदिरात आगमन झालं. मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर वारकरी व भक्तगण उपस्थित होते. आज दोन्ही पालख्या पुण्यात मुक्कामी असणार असून ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
हेही वाचा-