लाडकी बहीण योजनेसाठी 36 हजार कोटींची तरतूद; पण दरमहा 2100 रुपये मिळणार का?
अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेसाठी 36 हजार कोटींचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे.

Published : March 10, 2025 at 4:16 PM IST
|Updated : March 10, 2025 at 4:26 PM IST
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर पहिल्यांदाच अर्थसंकल्पीय अधिवेशन होत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यातील पहिल्या दिवशी (सोमवारी, 10 मार्च) म्हणजे आज राज्याचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला. या अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील नागरिकांना काय मिळणार? याकडं सर्वांचं लक्ष होतं. दरम्यान, या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेसाठी 36 हजार कोटींचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. मात्र, महायुतीनं विधानसभा निवडणुकीच्या काळात लाडकी बहीण योजनेंतर्गत महिलांना दरमहा 2100 रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यासंदर्भात कोणतीही घोषणा करण्यात आली नाही.
36 हजार कोटींची तरतूद : लाडक्या बहिणी मिळाल्या धन्य झालो, केली विकासाची कामे म्हणून आम्ही पुन्हा आलो.. पुन्हा आलो.. असे म्हणत लाडक्या बहिणींच्या आशीर्वादामुळेच राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार आल्याचं अजित पवार यांनी सूचवलं. तसंच, 2025-26 साठी लाडकी बहीण योजनेमध्ये 36 हजार कोटींची तरतूद करण्यात आलीय, असं अजित पवार यांनी विधानसभेत सांगितलं. ते म्हणाले की, "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत सुमारे 2 कोटी 53 लाख लाभार्थी महिलांना जुलै, 2024 पासून आर्थिक लाभ देण्यात येत आहे. त्यासाठी 33 हजार 232 कोटी रुपये खर्च झाला आहे. सन 2025-26 मध्ये या योजनेकरीता एकूण 36 हजार कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे. या योजनेतून मिळणाऱ्या अनुदानाचा उपयोग काही महिला गटांनी आर्थिक उपक्रमासाठी बीज भांडवल म्हणून केला असून अशा गटांना आणखी प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजना हाती घेण्याचे विचाराधीन आहे."
अद्याप 2100 रुपये देण्याचा निर्णय नाही : दरम्यान, लाडकी बहीण योजनेमुळं सरकारच्या तिजोरीवर भार टाकत असल्याचा आरोप सुरुवातीपासून होत असल्याचं दिसून येत होतं. तसंच, सुरुवातीला सरसकट असणारी ही योजना आता निकषाच्या जाळ्यात अडकत आहे. अशा परिस्थितीत लाडकी बहीण योजना बंद होणार का? अशी चर्चा सुरु असताना या अर्थसंकल्पात या योजनेसाठी 36 हजार कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित करण्यात आलीय. त्यामुळे ही योजना आता यापुढंही सुरूच राहणार आहे. परंतू, विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील लाडक्या बहिणींना 1500 रुपये दरमहा देण्यात आले. त्याचवेळी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान लाडक्या बहिणींना महायुतीचं सरकार आलं तर दरमहा 2100 रुपये देण्याचं आश्वासन देण्यात आलं. यानंतर राज्यात महायुतीचं सरकार आलं, मात्र अद्याप सरकारनं लाडकी बहीण योजनेंतर्गत महिलांना दरमहा 2100 रुपये देण्याचा निर्णय घेतला नाही.
लेक लाडकीसाठी 50 कोटी 55 लाखांचा खर्च प्रस्तावित : या अर्थसंकल्पात लेक लाडकी योजनेंतर्गत 1 लाख 13 हजार लाभार्थ्यांना थेट लाभ देण्यात आला आहे. पुढील वर्षासाठी या योजनेकरता 50 कोटी 55 लाखांचा खर्च प्रस्तावित असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. याचबरोबर, विद्यार्थिनींना शिक्षण आणि परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती सवलत देण्यात येणार आहे. मुलींच्या व्यावसायिक शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काची 100 टक्के प्रतिपूर्ती करण्यात येत आहे. मान्यताप्राप्त उच्च आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेणाऱ्या आणि ज्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशा विद्यार्थिनींना ही सवलत देण्यात येणार असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा :
- भारतीय क्रिकेट संघाचा अभिनंदनाचा ठराव मंजूर; सर्व खेळाडूंना प्रशस्ती पत्र पाठवणार, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती
- महाराष्ट्र आता थांबणार नाही, विकास आता लांबणार नाही - बजेट भाषणात अजित पवार यांची घोषणा
- नंदुरबारमधील मंदिरांमध्ये प्रवेशासाठी 'ड्रेस कोड' लागू होणार; महाराष्ट्र न्यास परिषदेत सर्वानुमते ठराव

