पुणे : अभिनेता आमिर खान याचा गाजलेला 'थ्री इडियट्स' चित्रपटासारखी घटना विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात घडली आहे. पुणे शहरातील वाघोली येथील पार्वतीबाई गेनबा मोझे कॉलेज ऑफ इंजिनियरींगमधील प्राध्यापक प्रतिक सातव यानं इंजिनिअरींगमधील शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाच सुरक्षा रक्षक बनवलं. त्यानंतर डुप्लिकेट चाव्या तयार करुन पेपर चोरून विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या प्रकरणी आरोपींना अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त निखील पिंगळे यांनी दिली.
आरोपीच्या वकिलांचा आरोप : या प्रकरणी पोलिसांनी प्राध्यापक प्रतिक किसन सातव यासह आदित्य खिलारे, अमोल नागरगोजे, अनिकेत रोडे यांना 2 जून रोजी अटक केली होती. शनिवारी त्यांची पोलीस कोठडी संपल्यावर त्यांना न्यायालयात हजर केलं होतं. आरोपीला पोलिसांनी पोलीस कोठडीतच मारहाण केल्याची तक्रार थेट आरोपींच्या वकिलांनी न्यायाधीशांच्या समोर केली.
काय आहे नेमकं प्रकरण? : पुण्यातील वाघोली येथील पार्वतीबाई गेनबा मोझे कॉलेज ऑफ इंजिनियरींग येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे. इंजिनिअरींगच्या पहिल्या वर्षीचा गणिताचा पेपर हा सर्व विद्यार्थ्यांसाठी अवघड विषय होता. हाच गणिताचा पेपर पास करून देण्यासाठी प्राध्यापक सातव यानं विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आत्ता या प्रकरणी एका तक्रारदारानं तर थेट पार्वतीबाई गेनबा मोझे कॉलेज ऑफ इंजिनियरींग यांनीच विद्यार्थ्यांकडून इंजिनियरींगच्या फीपेक्षा जास्त रक्कम घेतली असल्याचा आरोप केला आहे. आरोपी प्राध्यापक सातव यानं पेपर फोडल्याचे अनेक विद्यार्थ्यांसोबतचे चॅट समोर आले आहेत. यामुळं हे प्रकरण पुण्यात गाजलेल्या टीईटी घोटाळ्यापेक्षा मोठं असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पुणे विद्यापीठाकडं केली होती तक्रार : "सद्यस्थितीत अटकेत असलेला पार्वतीबाई गेनबा मोझे कॉलेजचा प्राध्यापक प्रतिक किसन सातव हा काही महिन्यापूर्वी कॉलेजचा मुख्य परीक्षा अधिकारी होता. त्याच्या या गैरकृत्याबाबत मी स्वतः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांचे परीक्षा व मुल्यमापन मंडळाकडे लेखी स्वरुपात तक्रार केली होती. या प्रकरणी परीक्षा व मुल्यमापन महामंडळाचे संचालक यांनी परीक्षा प्रमाद समितीसमोर उपस्थित राहून प्रतिक किसन सातव याला लेखी व तोंडी खुलासा देणेबाबत कळवले होते. या समितीसमोर मला सुद्धा माझ्या तक्रारीबाबत. खुलासा मागितला होता. त्याप्रमाणे मी माझा खुलासा समितीसमोर उपस्थित राहून सादर केला होता," अशी माहिती तक्रारदार किशोर सातव यांनी दिली.
हेही वाचा -