ठाणे Clash In Thane Jail : कल्याणच्या आधारवाडी कारागृहातील बंदिस्त दोन बंदीवानांमध्ये तुफान हाणामारी झाली. या घटनेत एकानं दुसऱ्यावर धारदार ब्लेडनं सपासप वार केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना आधारवाडी कारागृहातील बॅरेक नंबर पाचमध्ये घडली असून याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात हल्लेखोर बंदीवानावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युवराज नवनाथ पवार उर्फ लोहार असं हल्लेखोर बंदीवानाचं नाव आहे. तर अरविंद उर्फ मारी रवींद्र राम असं ब्लेड हल्ल्यात जखमी झालेल्या बंदीवानाचं नाव आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
दोन बंदीवानात तुफान हाणामारी : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याण पश्चिम भागातील आधारवाडी कारागृहात बॅरेक क्रमांक पाचच्या समोर दोन बंदीवानात तुफान हाणामारी झाली. यात हल्लेखोर युवराज नवनाथ पवार आणि दुसरा बंदीवान रोशन घोरपडे या दोघात वादावादी होऊन हाणामारी झाली. या वादामध्ये जखमी बंदीवान अरविंद उर्फ मारी रवींद्र राम यानं मध्यस्थी करुन घोरपडे आणि पवार यांच्यामधील वाद मिटवला. "हा वाद का मिटवला आणि तू मध्ये का पडला," असा प्रश्न युवराजनं अरविंदला केला. तो राग युवराजच्या मनात होता.
दात घासायच्या ब्रशमध्ये अडकला ब्लेड : हल्लेखोर युवराज आणि अरविंद कारागृहात समोरासमोर आल्यावर युवराजनं दात घासायच्या ब्रशमध्ये धारदार ब्लेडचे तुकडे अडकवले. या ब्लेडनं युवराजनं अरविंदच्या कान, चेहरा, डोक्यावर हल्ला करत सपासप वार केले. या हल्ल्यात अरविंद जखमी झाला. तत्काळ तुरुंग कर्मचाऱ्यांनी धावपळ करुन दोघांना दूर केलं. अरविंदवर धारदार ब्लेडनं हल्ला केला, तुरूंगाची शिस्त बिघडवली म्हणून महिला तुरूंग अधिकारी शोभा मधुकर बाविस्कर यांनी याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात हल्लेखोर युवराजविरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्या आला असून अधिक तपास खडकपाडा पोलीस करत आहेत, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
हेही वाचा :