मुंबई- गेल्या काही दिवसांपासून एसटी महामंडळ तोट्यात असल्याचे समोर आलं होतं. त्यामुळे एसटीला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी महायुती सरकारनं एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. एसटी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची नियुक्ती करण्यात आलीय. महाराष्ट्र शासन केंद्रीय अधिनियमान्वये तयार केलेल्या नियम आणि आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आलीय. वर्ष 1960 मध्ये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एसटी महामंडळ) स्थापना करण्यात आली. र. गो. सरैय्या हे महामंडळाचे पहिले अध्यक्ष होते. त्यानंतर अनेक महत्त्वाच्या व्यक्तींनी एसटी महामंडळाचे अध्यक्षपद भूषविले आहे. प्रताप सरनाईक हे एसटी महामंडळाचे 26 वे अध्यक्ष असणार आहेत.
दर्जेदार परिवहन सेवा निर्माण करण्यासाठी मी कटिबद्ध- सरनाईक : महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेची "लोकवाहिनी" असलेल्या एसटीला भविष्यात आर्थिक दृष्ट्या सक्षम करून एक चांगली दर्जेदार परिवहन सेवा निर्माण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलंय. तसेच आपल्याला या पदावर नियुक्त करून महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांचे त्यांनी आभार मानलेत.
देवेंद्र फडणवीसांनी परंपरा मोडीत काढली : 2014 ते 2019 दरम्यान शिवसेनेचे नेते दिवाकर रावते हे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष होते. त्यानंतर ठाकरे मुख्यमंत्री असताना महाविकास आघाडी सरकारच्या काळात अनिल परब यांच्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांच्याकडेच राज्याचे परिवहन खाते आणि एसटी महामंडळाचे अध्यक्षपद होते. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी ही परंपरा मोडीत काढली. आता शिंदे गटाचे मंत्रीच एसटी महामंडळावर पुन्हा कायम ठेवण्यात आले आहेत.
हेही वाचाः
ई-बाईक टॅक्सीला मान्यता, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय, भाडं किती असणार?