कोल्हापूर- शिवछत्रपतींचा अपमान करणारा आणि इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना फोन करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला अखेर आज जामीन मिळाला असून, दोन दिवसांनी कारागृहातून बाहेर काढण्यात आलंय, जामिनाचे पत्र कळंबा कारागृह प्रशासनाला मिळालेले नसल्यामुळे दोन दिवस प्रशांत कोरटकरला तुरुंगात काढावे लागलेत. अखेर आज कळंबा कारागृहाचे वरिष्ठ अधीक्षक नागनाथ सावंत यांनी दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास कोरटकरला पोलिसांच्या स्वाधीन केलंय.
25 मार्चला तेलंगणा राज्यातून कोल्हापूर पोलिसांकडून अटक : 25 फेब्रुवारी रोजी छावा चित्रपटाच्या निमित्ताने इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना फोन करून राजमाता जिजाऊ माँ साहेब, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करून इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्या प्रकरणात प्रशांत कोरटकरला महिनाभराने म्हणजेच 25 मार्च रोजी तेलंगणा राज्यातून कोल्हापूर पोलिसांनी अटक केली होती. यानंतर कोरटकरची रवानगी कळंबा कारागृहात करण्यात आली होती, इतिहासाचे अभ्यासक इंद्रजीत सावंत यांच्यामार्फत ऍड. असीम सरोदे यांनी जोरदार युक्तिवाद करत कोरटकरचा जेलमधील मुक्काम वाढवला होता, यानंतर 9 एप्रिल रोजी कोल्हापूरच्या न्यायालयाने 50 हजारांच्या जात मुचलक्यावर कोरटकरला जामीन मंजूर केला.
कोरटकर कोल्हापूर पोलिसांच्या स्वाधीन : परंतु जामिनाचे पत्र कळंबा कारागृहाला लवकर मिळाले नाही, यामुळे कोरटकरची कळंबा कारागृहातून सुटका लांबणीवर पडली होती, आज कारागृह प्रशासनाने ही प्रक्रिया पूर्ण करून दुपारी सव्वा दोन वाजता प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांच्या स्वाधीन केलंय. कडेकोट पोलीस बंदोबस्तात कोल्हापूर पोलीस खासगी वाहनातून कोरटकरला घेऊन रवाना झालेत, यावेळी कळंबा कारागृह परिसरात कोल्हापूर पोलीस दलाच्या वतीने राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्यांसह दंगल विरोधी पथक आणि पोलीस कर्मचारी असा मोठा बंदोबस्त यावेळी तैनात करण्यात आला होता.
कोरटकर विमानाने मुंबईकडे रवाना : कळंबा करागृहातून सुटका झाल्यानंतर पोलीस बंदोबस्तात प्रशांत कोरटकर थेट कोल्हापूर विमानतळावर पोहोचला, यानंतर विमानाने मुंबईच्या दिशेने कोरटकर रवाना झाला. न्यायालय परिसरात तीन वेळा कोरटकरवर हल्ल्याचा प्रयत्न झाला होता, यामुळे पोलिसांनी सतर्कता बाळगत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता, तपासासाठी जुना राजवाडा पोलिसांना सहकार्य करण्याच्या अटीवर कोरटकरला जामीन मंजूर केलाय. त्यामुळे भविष्यात कोरटकरची कोल्हापूरवारी वाढणार आहे, इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनीही न्यायालयाने घालून दिलेल्या अटी कोरटकर पाळणार की नाही याकडे आमचेही लक्ष असल्याचं माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं. त्यामुळे यापुढील काळात प्रशांत कोरटकरवर पोलीस आणि शिवप्रेमींची नजर राहणार आहे.
हेही वाचा :