कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूरच्या जिल्हा सत्र न्यायालयानं आज (दि.९) जामीन मंजूर केला. त्याला कोल्हापूर पोलिसांनी तेलंगणातून ताब्यात घेतलं होत. यानंतर कोरटकरला पोलीस कोठडी आणि न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती. आज प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर झाल्यानं लवकरच त्याची सुटका कळंबा कारागृहातून होणार आहे.
काय आहे प्रकरण? : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यासह मराठा साम्राज्याच्या इतिहासाबाबत इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत हे सातत्यानं समाज माध्यमात आपली भूमिका मांडतात. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित 'छावा' चित्रपटाबाबत एका वृत्तवाहिनीला त्यांनी मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी एका समाजाचा द्वेष पसरवल्याचा आरोप प्रशांत कोरटकरनं केला होता. त्यानं फोनवरुन इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी दिली. आपल्याला दिली गेलेली धमकी आणि शिवीगाळ झाल्याची ऑडिओ क्लिप स्वतः इंद्रजीत सावंत यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर टाकल्यानंतर कोरकटरचा मस्तवालपणा समोर आला होता.
तांत्रिक गोष्टींच्या आधारे जामीन मंजूर- प्रशांत कोरटकरला जामीन मिळाल्यानंतर इंद्रजीत सावंत यांचे वकील असिम सरोदे यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले, "ज्या कलमांच्या आधारे प्रशांत कोरटकरवर गुन्हे दाखल करण्यात आले होते, त्यामध्ये तीन वर्षांपेक्षा जास्त शिक्षा नव्हती. त्यामुळं तांत्रिक गोष्टींचा आधार घेत त्याला जामीन मंजूर होणं हे सहाजिकच आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपास पूर्ण झाला नाही, असं लेखी दिलं होतं. प्रशांत कोरटकरला काही अटींच्या आधारे जामीन मिळाला आहे. त्या अटीचं उल्लंघन केल्यास त्याचा जामीन रद्द करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत" असे असिम सरोदे म्हणाले.