कोल्हापूर- छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरला (Prashant Koratkar news) वकिलानं चांगलाच धडा शिकविण्याचा प्रयत्न केला. सुनावणी संपल्यानंतर पोलीस नेत असताना वकिलानं कोल्हापुरी पायताणानं त्याच्यावर हल्ला ( kolhapur court premises) करण्याचा प्रयत्न केला.
महिनाभर पोलिसांना गुंगारा देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी अटक केल्यानंतर आज त्याची पोलीस कोठडी संपली. कोल्हापुरातील जिल्हा सत्र न्यायालयात कोरटकरला हजर करण्यात आलं. न्यायालयातील सुनावणी संपल्यानंतर न्यायालयाच्या परिसरातील कॅन्टीनजवळ दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास एका वकिलानं छत्रपतींचा अवमान करतोस का, असा कोरटकरला जाब विचारला. त्यावेळी वकिलानं कोरटकरवर कोल्हापुरी पायताणानं हल्ला करण्याचा (advocate attack on Prashant Koratkar) प्रयत्न केला. मात्र, उपस्थित असलेल्या पोलिसांनी हल्ला करणाऱ्या वकिलाला पकडलं. यानंतर कोरटकरला राजारामपुरी पोलीस ठाण्यात आणण्यात आलं.
यापूर्वीदेखील कोरकटवर हल्ला करण्याचा प्रयत्न- इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना फोन करून जीवे मारण्याची धमकी दिलेल्या नागपूरस्थित प्रशांत कोरटकरला 25 मार्च रोजी कोल्हापूर पोलिसांनी तेलंगणा राज्यातून अटक केली. तब्बल एक महिन्यानंतर सापडलेल्या कोरटकरला तगड्या पोलीस बंदोबस्तात कोल्हापुरात आणण्यात आलं होतं. कोरटकरविरोधातील जनतेचा प्रचंड रोष पाहता कोल्हापूर सत्र न्यायालय परिसरात प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तेव्हादेखील त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता.
दोन दिवसांची पोलीस कोठडी- 25 मार्चला अटक झाल्यानंतर कोल्हापुरातील न्यायालयानं कोरटकरला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्याला न्यायालयानं आज 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती सरकारी वकील हेमा काटकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. पोलिसांचा तपास कौतुकास्पद आहे. तीन दिवसात पोलिसांनी खूप महत्त्वाचा तपास केला आहे. पुढील चौकशीसाठी पोलिसांनी आणखी कोठडी मागितली आहे. कोरटकरनं कुठेही ऑनलाईन पेमेंटचा कुठेही वापर केला नाही. त्याला कुणी आर्थिक मदत केली? आरोपीनं काही लोकांची नावे सांगितली आहेत. त्यांनी आरोपीला कशा प्रकारे मदत केली, हा तपासाचा भाग असल्याचं सरकारी वकील काटकर यांनी सांगितलं.
- कोल्हापुरातील शिवभक्तांनी आज सकाळी कोरटकर विरोधात निदर्शने केली. यामुळे पोलीस यंत्रणा सतर्क होती. त्यामुळे कोरटकर हा कोल्हापूरच्या पायताणचा मार खाण्यापासून थोडक्यात बचावला आहे. या हल्ल्याची कोल्हापूरसह राज्यभरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
हेही वाचा-