छत्रपती संभाजीनगर : परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणी औरंगाबाद खंडपीठानं राज्य सरकारला नोटीस बजावली असल्याची माहिती वंचित नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सुनावणीनंतर दिली. मंगळवारी झालेल्या सुनावणीत सदरील मृत्यू पोलीस कोठडीत झाला आहे, मात्र कायदा अपुरा असल्यानं तपासाबाबत कोर्टाने निर्देश द्यावेत अशी मागणी केली आहे. न्यायालयानं हे मान्य करून पुढील सुनावणी 29 एप्रिल रोजी ठेवली आहे.
एसआयटी नेमण्याची मागणी : सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्याप्रकरणी न्यायालयीन चौकशी करावी, अशी आम्ही मागणी करण्यात आली. मात्र यानंतर कारवाई कोण करणार याबाबत कायदा अपुरा असल्यानं तापसबाबत कोर्टाने निर्देश द्यावेत अशी आम्ही मागणी केल्याचं ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सुनावणीनंतर सांगितलं. तसंच न्यायालयानं युक्तीवाद ऐकून पुढील सुनावणी 29 एप्रिल ठेवली आहे. दरम्यान शासनाला नोटीस काढली आहे. या प्रकरणात एसआयटी नेमावी आणि ही एसआयटी सरकारच्या नाही तर कोर्टाच्या देखरेखी खाली काम करेल, अशी मागणी असल्याचं ॲड आंबेडकर यांनी सांगितलं.
सरकारच आरोपी : या प्रकरणी आरोपी राज्य सरकार आहे, त्यानुसर तपास कसा होईल ते आम्ही कोर्टात सांगितलं. त्यामुळं कोर्टानं यावर देखरेख करावी अशी आम्ही मागणी न्यायालयात केली आहे. सरकारच आरोपी असल्यानं सरकारकडून अपेक्षा धरणं योग्य नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भेट झाली, कायदा पूर्ण करा असं मी त्यांना बोललो. कायदा पूर्ण होईपर्यंत कस्टडी मृत्यूचा तपास होणार नाही. सीआयडीला सुद्धा आम्ही पुढील सुनावणीला आरोपी करणार आहोत अशी माहिती ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दिलीय.
सरकारवर समाधानी नाही : आम्ही सरकारवर समाधानी नाही, आंबेडकर साहेबांवर पूर्ण विश्वास असून त्यांच्याबाबत समाधानी आहोत, असं मत सोमनाथ सूर्यवंशी यांची आई विजयाबाई सूर्यवंशी यांनी व्यक्त केलं. तसंच आरोपींवर कारवाई व्हावी ही आमची मागणी आहे, पोलीस कोठडीत माझ्या मुलाला मारहाण झाल्यानं त्यांचा मृत्यू झाला. दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा ही आमची मागणी असून आंबेडकर साहेबांची आभारी असल्याची भावना विजयाबाई सूर्यवंशी यांनी व्यक्त केलीय.
हेही वाचा -