छत्रपती संभाजीनगर : मोटरसायकलवर येऊन तरुणींची छेडछाड करणाऱ्या रोड रोमिओला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. इतकंच नाही तर ज्या भागात त्याने महिलांना त्रास दिला. त्या भागामध्ये त्याची धिंड काढत नागरिकांना ते सुरक्षित असल्याची खात्री पोलिसांनी दिली. दरम्यान, सदर आरोपी मागील पंधरा दिवसांपासून रस्त्यावर चालणाऱ्या महिला पाहून सुसाट दुचाकीवर येऊन आक्षेपार्ह पद्धतीने स्पर्श करून पळून जात होता. या घटनांनाचे सीसीटीव्ही व्हिडीओ समाज माध्यमांवर चर्चेत आले. एका महिलेच्या तक्रारीनंतर वेदांतनगर पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली.
महिलांची काढत होता छेड : रोज नवनवीन कपडे घालून, दुचाकीवर सुसाट वेगात येत हा विकृत आरोपी रस्त्यावरून पायी जाणाऱ्या महिला, तरुणींना आक्षेपार्हरीत्या स्पर्श करून पसार होत होता. मागील १५ दिवसांपासून वेदांतनगर, उस्मानपुऱ्यातील होस्टेल, महाविद्यालयाच्या परिसरात हा प्रकार घडल्याचे समोर आले. सायंकाळी अंधार पडल्यावर, कमी वर्दळीच्या परिसरात या आरोपीचा अधिक वावर असायचा, त्यामुळे महिला, तरुणी बाहेर पडण्यासही घाबरत होत्या. या घटनांचे सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आले. तसेच वेदांतनगर पोलिसात एका महिलेने फोनवर तक्रार दिली. त्यानंतर आरोपी वापरत असलेल्या गाडीचा क्रमांक मिळाला. त्यानुसार पोलीस निरीक्षक प्रविणा यादव यांनी तातडीने या आरोपीच्या शोधासाठी पथक तयार केले. पोलिसांच्या पथकाने अवघ्या काही तासाच्या आत, या आरोपीच्या मुसक्या आवळल्या. गजानन दत्तराव गडदे असे या आरोपीचे नाव असून तो हिंगोली जिल्ह्यातील शेणगाव तालुक्यातील रहिवाशी आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक प्रवीणा यादव यांनी दिली आहे.
पोलिसांनी काढली आरोपीची धिंड : गजानन गडदे रस्त्यावर येऊन महिलांची छेड काढत होता. त्यामुळे वेदांतनगर, उस्मानपुऱ्यात महिला, तरुणींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीला बेड्या ठोकत त्याची दहशत कमी करण्याच्या उद्देशाने, आरोपी गजानन गडदेची संपूर्ण परिसरात पायी धिंड काढली. महिला सुरक्षित असल्याची भावना पोलिसांनी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रविणा यादव यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक वैभव मोरे पोलीस कॉन्स्टेबल सुलाने पोलीस कॉन्स्टेबल दोईफोडे यांनी केली आहे.
हेही वाचा :
- मुंबईकरांनो, रविवारी घराबाहेर पडताय? मग, रेल्वेचं 'हे' वेळापत्रक वाचा; मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक!
- अखेर 'लुटेरी दुल्हन' पोलिसांच्या जाळ्यात; नाशिकमध्ये सासरच्यांना गुंगीचे औषध देऊन दागिन्यांसह झाली होती पसार
- पाच लाख भाविकांच्या उपस्थितीत दख्खनचा राजा जोतिबाची चैत्र यात्रा, डोंगरावर 'चांगभलं'चा गजर