नाशिक : पोलीस या ना त्या कारणानं गुन्ह्याच्या जाळ्यात अडकतात. मात्र सर्वसामान्य गुन्हेगारांवर होणाऱ्या कारवाई प्रमाणं पोलिसांवर देखील कारवाई केली जाईल, अशी भूमिका पोलीस आयुक्तांनी घेतल्यानं पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे.
अडीच महिन्यात शहरात 14 खुनाच्या घटना : नाशिकमध्ये एकीकडं गुन्हेगारीनं डोकं वर काढला असून अडीच महिन्यात शहरात 14 खुनाच्या घटना घडल्या आहेत. असं असताना लग्न झालेली असताना महिलेशी खोटा विवाह करत तिचं लैंगिक शोषण करणारा पोलीस, एमडी ड्रग्ज प्रकरणातील तस्करांशी हितसंबंध असलेला पोलीस, खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींसोबत पार्टी करणारे पोलीस, अशी ओळख आता नाशिक पोलिसांची होऊ लागली आहे. त्यामुळे नागरिकांचे रक्षकचं आता भक्षक झाल्यानं सर्वसामान्य नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. अशात पोलीस आयुक्त संदिप कर्णिक यांनी या सर्व प्रकरणांची चौकशी सुरू केली असून यातील काही पोलीस कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलं आहे.
एमडी ड्रग्ज पेडलर्सशी हितसंबंध : एमडी ड्रग्ज पेडलर्सशी हितसंबंध असो किंवा गोवंश तस्करांशी पोलिसांची जवळी होती. यातील तस्करांशी वेळोवेळी फोन करून संपर्क साधत जवळीक निर्माण करणारा निलंबित पोलीस हवालदार युवराज पाटील यास पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी बडतर्फ केलं आहे. एमडी ड्रग्ज पेडलर्सशी फोनवर संभाषण करत गोपनियतेचा भंग करणं, पोलीस दलाची प्रतिमा मालिन करणं, गुन्हेगारांना प्रतिबंध करण्याची जाणीव असतानाही पाठीशी घालून साथ देणं, त्यांच्या गुन्हेगारी वर्तनात सहभागी होणं असा आरोप बडतर्फ पोलीस कर्मचारी युवराज पाटील याच्यावर ठेवण्यात आला आहे. त्याच्या विरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र गुन्हा दाखल होताच युवराज पाटील हा फरार झालाय.
युवराज पाटील याचे आरोपींशी झालेले कॉल :
छोटी भाभी 522 कॉल,
इरफान शेख 212 कॉल,
इम्तियाज शेख 139 कॉल,
अजय रायकर 48 कॉल,
शाहरुख शहा 87 कॉल,
सदाशिव गायकवाड 9 कॉल
खुनाच्या आरोपींसोबत पार्टी : पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी उपनगर आणि अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. खुनाच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी प्रफुल्ल पाटील आणि कुंदल घडे यांना न्यायालयीन कामकाजासाठी कैदी पार्टीचे आमदार पद्मसिंह रउळ, दीपक जठार, विकी चव्हाण, गोरख गवळी यांनी पोलीस वाहनातून न्यायालयात आणलं होतं. कामकाज ऑटोपल्यानंतर दुपारी तीननंतर आरोपींना कारागृहात सोडण्याकरता जात असताना पुणे रोडवरील एका हॉटेलमध्ये पोलीस आणि संशयित आरोपींनी पार्टी करत होते. यावेळी एका सुज्ञ नागरिकानं पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना कळवलं, आयुक्तांनी याची गंभीर दखल घेत सहाय्यक आयुक्त शेखर देशमुख आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना खात्री करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर पथकानं हॉटेलमध्ये छापा टाकला असता पोलीस अंमलदार संशयित आरोपीसोबत पार्टी करताना मिळून आलं. त्यांची चौकशी करून हा अहवाल पोलीस आयुक्तांकडं पाठवला आहे. आता पोलीस आयुक्त याबाबत काय दखल घेतात, याकडं सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा :