छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरात समलैंगिक डेटिंग अॅपच्या माध्यमातून लोकांची लुटमार करणाऱ्या सुशिक्षित तरुणांनी फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. मागील वर्षभरापासून अनेकांना या टोळीनं समलैंगिक असल्याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत लुटमार आणि मारहाण केली आहे. आरोपींपैकी तिघांना दौलताबाद पोलिसांनी अटक केली आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांनी दिली आहे.
बनावट प्रोफाइल तयार करत फसवणूक : छत्रपती संभाजीनगर शहरात समलैंगिक डेटिंग अॅपच्या माध्यमातून समाज माध्यमांवर बनावट प्रोफाइल तयार करत लुटमार केल्याची घटना घडली. मागील वर्षभरात जवळपास 10 ते 15 पेक्षा अधिक सुशिक्षित तरुणांची फसवणूक करण्यात आली. सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख निर्माण करायची, त्यानंतर आपल्या बोलण्यात अडकवून त्यांना निर्जनस्थळी भेटायला बोलवायचं. त्यानंतर सदरील युवकाला तू समलिंगी आहेस, तुझा video तयार करून सोशल मीडियावर प्रसिद्ध करतो, अशी धमकी देत मारहाण आणि लुटमार केली. समाजात बदनामी होईल या भीतीनं घटनेबाबत कोणीही तक्रार दिली नाही. मात्र एका युवकानं तक्रार देण्याची तयारी दाखवल्यानं गुन्हा दाखल करण्यात आला.
तिघांना पोलिसांनी केली अटक : समलिंगी असल्याचा आणि मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल करतो, अशी धमकी देऊन लुटमार केल्याची धक्कादायक घटना घडल्यावर दौलताबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तातडीनं पाऊल उचलत आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणात अजून पीडित तरुणांची फसवणूक झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. शिवम सुरेश पवार, राहुल राजू खांडेकर, आयुष संजय लाटे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. तिन्ही आरोपी सुशिक्षित असून त्यांच्याकडून मोबाईलसह इतर साहित्य जप्त करण्यात आलं आहे. याप्रकरणी तक्रादारांनी समोर यावं, असं आवाहन छत्रपती संभाजीनगरचे पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांनी केलं आहे. तर या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत असल्याचंही त्यांनी सांगितलं.
हेही वाचा :