मुंबई– मुंबईतील विविध भागात भर उन्हाळ्यात अपुऱ्या आणि दूषित पाण्याची समस्या नागरिकांना भेडसावत आहे. नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत आहेत. पाण्याची गंभीर समस्या महापालिका प्रशासन तातडीने कशी सोडविणार याबाबत महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी मुंबईकरांसमोर उपाययोजना जाहीर करावी, अशी मागणी शिवसेनेचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी केलीय. सोबतच मुंबई महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयात साहाय्यक प्राध्यापकपदाची 558 रिक्त पदे तातडीने भरण्यात यावी, अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केलीय. आदित्य ठाकरे यांनी वरील विषयावर एक लिखित निवेदन पालिका आयुक्तांना दिलंय.
मुंबईकरांचे पाण्याअभावी प्रचंड हाल : मुंबईमध्ये रहिवाशांना सध्या कमी दाबाने आणि अपुरा पाणीपुरवठा होत आहे. बऱ्याच ठिकाणी गढूळ पाणी तसेच अस्वच्छ पाणीपुरवठा होत आहे. मुंबई शहरामध्ये पाणीपुरवठ्यासाठी उपलब्ध असलेले टँकर धारक काही प्रमाणात पाणीपुरवठा करीत असतात. परंतु सध्या तेही संपावर गेलेले आहेत. त्यामुळे मुंबईकरांचे पाण्याअभावी प्रचंड हाल होत आहेत. उन्हाळा तोंडावर असतानाच पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे. तरी आपण पत्रकार परिषद घेऊन हा मुंबईतील पाणी प्रश्न कसा सोडवणार याबाबत मुंबइतील जनतेला अवगत करून आश्वस्त करावे, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी पत्राद्वारे केलीय.
सहाय्यक प्राध्यापकांच्या पोस्ट भरल्या गेलेल्या नाहीत : मुंबईतील महापालिकेचे रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय मुंबईतील रहिवाशांच्या आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. सध्या मुंबई महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एकूण 801 सहाय्यक प्राध्यापक पदे आहेत. त्यापैकी केवळ 243 पदे ही नियमित आणि करार तत्त्वावर असलेल्या डॉक्टरांच्या नियुक्त्यांनी भरलेली आहेत. मागील 6 ते 7 वर्षांपासून सहाय्यक प्राध्यापकच्या पोस्ट भरल्या गेलेल्या नाहीत. त्यामुळे या सहाय्यक प्राध्यापकांमध्ये प्रचंड नाराजी असून, त्यांचे पात्र वयसुद्धा निघून जात आहे. या डॉक्टरांना कायमस्वरूपी नोकरीसाठी भविष्यात त्रास होऊ शकतो, अशी भीतीदेखील आदित्य ठाकरे यांनी पत्राद्वारे व्यक्त केलीय.
महिला डॉक्टरांना प्रसूती रजा देण्यात येत नाहीत : कंत्राटी सहाय्यक प्राध्यापकांना कायम नोकरीमध्ये समायोजन करून घेण्यात यावे. तसेच त्यांचा सध्याचा पगार निवासी डॉक्टरांएवढाच असावा आणि त्यामध्ये वाढ करण्यात यावी. या सहाय्यक प्राध्यापकांना दर 40 दिवसांनी ब्रेक दिला जातो. ही पद्धतदेखील बंद करून, त्यांना ब्रेक न देता सेवेत घेण्यात यावेत. महिला डॉक्टरांना प्रसूती रजा देण्यात येत नाहीत. त्या देखील देण्यात याव्यात. जेणेकरून मुंबईतील नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा देण्यासाठी या सहाय्यक प्राध्यापक डॉक्टरांचा फायदा होईल, असेही आदित्य ठाकरे यांनी आपल्या पत्रात नमूद केलंय. त्यामुळे आयुक्तांनी पाणी समस्या आणि वैद्यकीय महाविद्यालयातील साहाय्यक प्राध्यापक पदाच्या रिक्त जागा या दोन्ही निकडीच्या समस्यांकडे लक्ष देऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न करावा, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केलीय.
हेही वाचाः
साताऱ्यात स्विफ्ट, ओम्नी कार अन् पिकअपचा तिहेरी अपघात, 2 ठार, 7 जखमी