ETV Bharat / state

स्वच्छ सर्वेक्षणात देशात पाचवा क्रमांक मिळालेल्या शहरात कचऱ्याचे ढीग; शहरातील स्वच्छतेची भीषण वास्तविकता

अहिल्यानगर शहरातील रस्त्यावर आणि सोसायट्यांच्या आवारात अक्षरशः कचऱ्याचे ढीग साचल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

Ahilyanagar News
शहरात कचऱ्याचा ढीग (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : July 21, 2025 at 8:26 PM IST

3 Min Read
Choose ETV Bharat

अहिल्यानगर : केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शहरी सन 2024 च्या स्वच्छ सर्वेक्षणाचा निकाल जाहीर झाला आहे. यात 3 ते 10 लाख लोकसंख्या असलेल्या शहरांच्या गटामध्ये अहिल्यानगर शहराचा देशात पाचवा क्रमांक तर राज्यात चौथा क्रमांक आला आहे. स्वच्छ शहरामध्ये यंदाही अहिल्यानगरला थ्री स्टार मानांकन देण्यात आले आहे. परंतु, आता शहरातील वास्तविकता मात्र याउलट आहे. महापालिकेच्या कारभारावर आणि सुविधांवर शहरातील नागरिक प्रचंड नाराज आहेत. एकीकडं देशात पाचवा क्रमांक पटकावलेल्या शहरात अक्षरशः कचऱ्याचे ढीग, ओढ्यात जलपर्णी, कचरा, गाळ प्रचंड प्रमाणावर साचलेला दिसून येत आहे. यावर शहरातील नागरिकांनी पालिका प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.



महानगरपालिकेच्या कामगिरीत अव्वल क्रमांक : मागील वर्षअखेरीस झालेल्या सर्वेक्षणात शहरातील स्वच्छता गृहे, कचरा डेपोतील प्रक्रिया केंद्र, डम्पिंग साईट, शहरातील दैनंदिन साफसफाई, जलस्रोत आदींच्या स्वच्छतेची तपासणी करण्यात आल्याचं महानगरपालिकेकडून माध्यमांना दिलेल्या माहितीत म्हटलं आहे. तर जलस्रोत, निवासी आणि मार्केट परिसर, शौचालयांची स्वच्छता आदींमध्ये अहिल्यानगर महानगरपालिकेनं केलेल्या कामगिरीत अव्वल गुणांकन देण्यात आले आहे.



आठवड्यातून एकदा येते कचरा गाडी : शहरातील कचरा संकलनाबाबत नागरिकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. शहरातील सर्वच भागामध्ये कचऱ्याचं संकलन करणारी गाडी वेळेवर पोहचत नसल्यानं परिणामी रस्त्यावर कचऱ्याचे ढीग साचले आहे. याबाबत नागरिकांना विचारले असता त्यांनी सांगितलं की, गेल्या काही दिवसांपासून प्रभागात कचरा गाडी येत नाही. अनेकदा प्रभाग अधिकाऱ्यांना तसंच महापालिका कर्मचाऱ्यांना तक्रारी करूनही आठवडा-आठवडा गाडी येत नाही. त्यामुळं परिसरात मोठ्या प्रमाणावर कचरा साचला असून याचा त्रास आम्हालाच सोसावा लागतो.

प्रतिक्रिया देताना नागरिक (ETV Bharat Reporter)



महापालिकेला नामांकन कसं मिळालं ? : "शहरात दिवसभर कचरा तसाच साचलेला असतो. महानगरपालिकेला स्वच्छतेचा नामांकन मिळालं कसं?," असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत उर्फ काका शेळके यांनी केला आहे. स्वच्छ भारत मिशनच्या समितीनं नेमकी शहराची पाहणी कधी केली पहाटे की रात्री? शहरातील ओढ्या नाल्यांच्या साफसफाईमध्ये देखील अनेक त्रुटी असून अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांकडून शॉर्टकट वापरला जातो. त्यामुळं आजही ओढ्या नाल्यातील कचरा तसाच आहे. शहराची ही दुरावस्था केवळ प्रशासनाच्या अनास्थेमुळं आहे.



शहराला थ्री स्टार की थर्ड स्टार? : दरम्यान अहिल्यानगर महानगरपालिकेला थ्री स्टार नामांकन मिळाल्यावर, यावर सामाजिक कार्यकर्ते शेळके यांनी भाष्य केलं आहे. ते म्हणाले, "शहराला थ्री स्टार नेमका कशाचा मिळाला आहे. ते थ्री स्टार आहे का थर्ड क्लास स्टार आहे, की थर्ड डिग्री आहे, याबाबत आयुक्तांनी नगरकरांना सांगितलं पाहिजे. प्रभागातील साचलेल्या कचऱ्यामुळं अनेकांना डेंग्यू झाला आहे. वास्तविक प्रभागात ३ ते ४ हजार डेंग्यूचे रुग्ण सापडतील अशी अवस्था आहे. याकडं प्रशासनानं गांभीर्यानं लक्ष दिलं पाहिजे, " अशी मागणी यावेळी चंद्रकांत शेळके यांनी केली.



कचरा गाडीवरील स्पीकर बंद, कर्मचाऱ्यांची अरेरावी : कचरा गाडीवर कचरा संकलन करणारे कर्मचारी नागरिकांना कुठलीही सहकार्याची भावना ठेवत नाही. आठवड्यातून एकदा येणाऱ्या गाडीला कुठलाही स्पीकर नाही की, हॉर्न नाही. कर्मचारी लाकडी काठीच्या सहाय्याने वाजून तसेच काही ठिकाणी आवाज दिला जातो. त्यामुळं घरात अनेक दिवसांचा साचलेला कचरा गाडीवर आणेपर्यंत कचरा गाडी पुढे निघून जाते. तर गाडीवर कर्मचारी देखील नागरिकांना अरेरावीची भाषा करत ज्येष्ठ नागरिकांना कचरा गाडीत टाकण्यासही मदत करत नसल्याचं भावना नागरिकांनी बोलून दाखवली.


उपाययोजना करून सेवा सुरळीत करण्याचा प्रयत्न : "महानगरपालिकेनं स्वच्छतेच्या विषयात नेहमीच आग्रही भूमिका घेतली आहे. सातत्यानं स्वच्छता अभियान, मोहिमा राबवणं, विविध संस्थांच्या सहभागातून स्वच्छता मोहीम राबवणं असे उपक्रम घेतले जातात. मागील वर्षात महानगरपालिकेने स्वच्छतेसाठी चांगलं काम केलं होतं. त्यामुळं रिझल्ट चांगला आला. मात्र, गेल्या काही दिवसांपासून घरातून होणाऱ्या कचरा संकलनात त्रुटी निर्माण झाल्या आहेत. ठेकेदार संस्थेकडून वाहनांची संख्या न वाढवण्यात आल्यानं अनेक ठिकाणी कचरा संकलन सेवा विस्कळीत झाली आहे. यात उपाययोजना करून सेवा सुरळीत केल्या जात आहेत. सध्याच्या ठेकेदार संस्थेला मुदतवाढ न देता नवीन संस्था लवकरच नियुक्त केली जाणार आहे, असं महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा -

  1. कचरा गोळा करून केला अभ्यास: पुण्याच्या 'लेकी'नं दहावीत मिळवलं घवघवीत यश
  2. कचरा वेचक बालिकेचा मृतदेह आढळला संशयास्पद; संतप्त झालेल्या नागरिकांनी रोखला रस्ता
  3. मुंबईत दररोज निर्माण होणारा 6.5 हजार मेट्रिक टन कचरा टाकायचा कुठे?, कांजूरमार्ग कचराभूमी बंद झाल्यानं महानगरपालिकेची पंचाईत