नाशिक - जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरण घाटीत भारतीय पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर केंद्र सरकारकडून पाकिस्तानी नागरिकांना 48 तासात भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले. मात्र भारत सरकारचा हा नियम ज्या पाकिस्तानी हिंदूंना दीर्घकालीन भारतीय व्हिसा देण्यात आला आहे, त्यांना लागू होणार नाही असं परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्ध पत्रकारद्वारे स्पष्ट केलं आहे. त्यामुळे हिंदूंचा दीर्घकालीन व्हिसा वैधच राहणार आहे.
जम्मू आणि काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला असून अनेक जखमी झाले आहेत. या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानी नागरिकांसाठी सर्व प्रकारच्या व्हिसा सेवा तत्काळ स्थगित केल्या आहेत. या नियमानुसार भारत सरकारने पाकिस्तानी नागरिकांना दिलेले सर्व वैध व्हिसा 27 एप्रिल पासून रद्द करण्यात आले आहेत. मात्र वैद्यकीय कारणांसाठी दिलेले व्हिसा 29 एप्रिल पर्यंत वैध राहतील असंही सांगण्यात आलं आहे, असं परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्धी पत्रकारद्वारे स्पष्ट केलं आहे.
पाकिस्तानच्या सहा महिला नाशिकमध्ये - नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाकडे सहा पाकिस्तानी महिला नागरिकांच्या वास्तव्याची नोंद आहे. नाशिकमध्ये सहा पाकिस्तानी महिला राहात आहेत. यासंदर्भात फॉरेन रजिस्ट्रेशन कार्यालयाकडून पोलीस आयुक्तालयाला लेखी सूचना प्राप्त झाल्यानंतर पोलिसांकडून कारवाई करण्यात येईल असं सांगण्यात आलं आहे. पाकिस्तानी महिला या अधिकृतरित्या वेगवेगळ्या कारणांसाठी शहरात मागील काही दिवसांपासून वास्तव्यास आहेत, अशी माहिती पोलीस आयुक्तालयाकडून देण्यात आली आहे.
विदेशी नागरिकांवर एफआरआरओचे लक्ष - विदेशी नागरिक अधिकृतरित्या व्हिसा घेऊन भारतातील कुठल्याही शहरात वास्तव्यास असतात त्यांच्यावर पोलीस यंत्रणेसह एफआरआरओ कार्यालयाचा वॉच असतो. त्यांच्यावर देखरेख, त्यांच्या मुक्कामाची नोंद ठेवून व्हिसा परवानगी बाबतची प्रक्रिया देखील या कार्यालयाकडून करण्यात येते. विदेशी नागरिकांना भारतात आल्यानंतर 30 दिवसाच्या आत एफआरआरओ कार्यालयाकडे नोंदणी करणं बंधनकारक असतं.
अधिकृत प्रत प्राप्त झाल्यानंतर कारवाई होणार - पहलगाम हल्यानंतर त्वरित निर्णय घेत पाकिस्तानच्या नागरिकांना 48 तासात देश सोडण्याचे आदेश दिल्यानंतर त्या दृष्टीने प्रशासन सतर्क झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदेश दिल्यानंतर त्याची अधिकृत प्रत प्रशासनाला प्राप्त झाल्यानंतर कारवाई केली जाईल असं जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा...