मुंबई : पहलगाम इथं दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात 27 पर्यटकांचा बळी गेला आहे. दहशतवाद्यांनी केलेल्या या हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा पर्यटक ठार झाले आहेत. पहलगाममध्ये ठार झालेल्या या पर्यटकांचं पार्थिव मुंबई विमानतळावर आणण्यात आलं आहे. संजय लेले, अतुल मोने आणि हेमंत जोशी यांचं पार्थिव मुंबई विमानतळावर आणण्यात आलं. यावेळी अनेक नेत्यांनी पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं. त्यानंतर अत्यंत शोकाकूल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
संजय लेलेंच्या मुलाच्या हाताला चाटून गेली गोळी : जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम इथं कुटुंबासह पर्यटनासाठी गेलेले तीन रहिवासी दहशतवादी हल्ल्यात ठार झाले. यात संजय लेले (44), अतुल मोने (52) आणि हेमंत जोशी यांचा समावेश आहे. संजय लेले यांच्या हर्षल नावाच्या मुलाच्या हाताला एक गोळी चाटून गेली आहे. त्यामुळे तोही या भ्याड हल्यात जखमी झाला आहे. अतुल मोने हे डोंबिवली पश्चिमेत ठाकूरवाडी भागात राहतात. मोने हे पत्नी आणि मुलीसह पर्यटनासाठी पहलगाम इथं गेले होते. अतुल मोने हे मध्य रेल्वेच्या परळ येथील कार्यशाळेत विभागीय अभियंता म्हणून कार्यरत होते. अतुल मोने यांच्या सोबत डोंबिवलीत राहत असलेले हेमंत जोशी आणि संजय लेले हे देखील त्याच गटानं पहलगाम इथं सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गेले होते. दुर्दैवानं त्यांचाही या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला आहे. तर नवीन पनवेल येथील रहिवासी दिलीप देसले यांचाही या हल्ल्यात दुर्दैवानं मृत्यू झाला.
मुंबई विमानतळावर पार्थिव दाखल : देसले यांचं पार्थिव दुपारी 4:45 च्या सुमारास मुंबई विमानतळाहून पोलीस बंदोबस्तात पनवेलच्या दिशेनं रवाना झालं तर लेले, मोने आणि जोशी यांची पार्थिवं 6:15 च्या सुमारास एकत्र डोंबिवलीच्या दिशेनं रवाना झाली. यावेळी सत्ताधारी पक्षाचे सर्व स्थानिक नेते जातीनं हजर होते. ज्यात आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा, रवींद्र चव्हाण, दादा भुसे, गुलाबराव पाटील आणि मुरजी पटेल यांचा समावेश होता. विमानतळावर कश्मिरहून या चौघांचे काही नातेवाईक उपस्थित होते. याशिवाय त्यांचे इथले नातेवाईकही या कठीण प्रसंगी परिवाराचं सांत्वन करण्यासाठी आले होते. दरम्यान पहलगाम इथं ठार झालेल्या पर्यटकांवर रात्री उशीरा अंत्यसंस्कार करण्यात आले.
हेही वाचा :