कोल्हापूर : भारताचे स्वित्झर्लंड आणि नंदनवन असलेल्या काश्मीरमधल्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. यात 26 जणांचा मृत्यू झाला. त्यात महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचा समावेश होता. या हल्ल्याच्या निषेधार्थ देशभरात पडसाद उमटत आहेत. पहलगाममध्ये झालेल्या या हल्ल्यानंतर पर्यटकांनी काश्मीरकडं पाठ फिरवली आहे. त्यामुळं काश्मीरमधली पर्यटनावर चालणारी आर्थिक उलाढाल कमी होण्याची शक्यता आहे.
लाखो रुपयांचाी उलाढाल ठप्प : पर्यटनासाठी भारतासह विदेशातील नागरिक काश्मीरला जातात. वर्षभर काश्मीरकडं जाण्यासाठी पर्यटकांची रीघ लागलेली असते. मात्र, पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर अनेकांनी आपला काश्मीर दौरा रद्द केलाय. तर, अनेकांनी आपल्या पर्यटनाचं ठिकाण बदललं आहे. या हल्ल्यानंतर कोल्हापुरातून काश्मीरला जाणाऱ्या पर्यटकांनी मे महिन्यातील बुकिंग रद्द केलय. त्यामुळं लाखो रुपयांची उलाढाल ठप्प होणार आहे. "वर्षभर पर्यटनावर या हल्ल्याचा दूरगामी परिणाम सोसावा लागणार आहे," असं मत देश-विदेशात सहलीचं आयोजन करणारे महेश गोवेकर यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केलं.
देशभरातून संताप व्यक्त : काश्मीरमधल्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. परिणामी कोल्हापुरातून जाणाऱ्या पर्यटकांनी काश्मीरचं बुकिंग रद्द केलंय. दरवर्षी कोल्हापुरातून काश्मीरला सुमारे 6 हजार पर्यटक जातात. यंदाही भारताचं स्विझर्लंड असलेल्या काश्मीरला जाणाऱ्यांची संख्या वाढली होती. मात्र, पहलगाम इथं दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर देशभरात याबद्दल संताप व्यक्त होत आहे.
कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प : "काही दिवसांत शालेय सुट्ट्या सुरू होणार आहेत. त्यामुळं कोल्हापुरातील वेगवेगळ्या खासगी कंपन्यांच्या माध्यमातून काश्मीरला जाण्यासाठी बुकिंग केलं होतं. मात्र, या हल्ल्यानंतर सुमारे 80 टक्के पर्यटकांनी काश्मीरचा दौरा रद्द केलाय. तर, अनेकांनी उत्तराखंड, अरुणाचल प्रदेश आणि हिमाचल प्रदेश सारख्या थंड हवेच्या ठिकाणांना प्राधान्य दिलय. याचा थेट परिणाम पर्यटनावर होणार असून सुमारे 36 कोटींची वार्षिक उलाढाल ठप्प होणार आहे, अशी प्रतिक्रिया महेश गोवेकर यांनी दिली.
अनेकांनी बुकिंग केलं रद्द : "कोल्हापुरात विविध टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या माध्यमातून देश-विदेशात सहलींचं आयोजन केलं जातं. कोल्हापुरातून अनेक खासगी टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून खास काश्मीरसाठी सहली आयोजित करतात. कोल्हापुरातून दरवर्षी सहा हजार पर्यटक काश्मीरला जातात. परंतु, या हल्ल्यानंतर अनेक पर्यटकांनी आपलं बुकिंग रद्द केलंय," अशी माहिती महेश गोवेकर यांनी दिली.
कोल्हापूरचे 200 जण काश्मीरमध्ये सुरक्षित : "वेगवेगळ्या पर्यटन कंपन्यांकडून काश्मीरमध्ये सहलीसाठी गेलेले कोल्हापूर जिल्ह्यातील 200 पर्यटक काश्मीरमध्ये अडकले आहेत. हे सर्व पर्यटक काश्मीरमध्ये सुखरूप आहेत. केंद्र सरकारनं लवकरात लवकर याबाबत भूमिका घेऊन ठप्प झालेला पर्यटन व्यवसाय सुरळीत होण्यासाठी कायमस्वरूपी उपाय योजना कराव्यात," अशी मागणी महेश गोवेकर यांनी केली.
हेही वाचा :