
ऑनलाइन पेमेंटची थाप मारून पानवाल्याला लावला चुना, चार हजारांची सिगारेट घेऊन पळालेला भामटा सीसीटीव्हीत कैद
उल्हासनगर शहरातील दुर्गादेवी पाडा के. पी. पान शॉपमध्ये घडली असून, सिगारेटची पाकिटे घेऊन लंपास झालेला भामटा सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.

Published : October 12, 2025 at 5:21 PM IST
|Updated : October 12, 2025 at 5:32 PM IST
ठाणे: एका पान शॉप दुकानदाराकडून 4100 रुपयांच्या दहा सिगारेटचे पाकीट घेऊन त्याचे गुगल पे ऑनलाईन पेमेंट केले, अशी थाप मारून एक भामटा फरार झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना उल्हासनगर शहरातील दुर्गादेवी पाडा के. पी. पान शॉपमध्ये घडली असून, सिगारेटची पाकिटे घेऊन लंपास झालेला भामटा सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. याप्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात त्या अज्ञात भामट्या विरोधात पानवाल्याने तक्रार दाखल केली आहे.
दुकान गुड्डू यादव यांच्या मालकीचे : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उल्हासनगर कॅम्प नंबर 5 च्या दुर्गादेवी पाडा परिसरात असलेल्या के. पी. पान शॉप नावाचे दुकान असून, हे दुकान गुड्डू यादव यांच्या मालकीचे आहे. त्यातच शुक्रवारी सायंकाळी हा अज्ञात भामटा ग्राहक म्हणून के. पी. पान शॉप याठिकाणी आला, त्याने तब्बल 4100 रुपयांच्या किमतीच्या विविध कंपन्यांची सिगारेट खरेदी केली, त्यानंतर गुगल पे करतो अशी थाप मारून झटपट दुचाकीवरून पसार झाला. पान शॉप मालक हा अत्यंत गरीब असून, त्याने व्याजाने पैसे घेऊन व्यवसाय सुरू केलाय, परंतु पानवाल्याला चुना लावून पसार झालेल्या त्या भामट्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी पान शॉप मालक यादव करीत आहेत.
सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या ताब्यात : यादव यांच्या तक्रारीवरून शिवाजी नगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतली आहेत, तसेच त्या अज्ञात भामट्याचा शोध सुरू केला आहे. खळबळजनक बाब म्हणजे यादव यांच्या माहितीनुसार याच भामट्याने याच परिसरातील आणखी काही दुकानदारांना ऑनलाइन गुगल पे करीत असल्याची थाप मारून चुना लावला आहे. आता पोलीस पथक भामट्याला पकडल्यानंतरच त्याने आणखी किती दुकानदारांची फसवणूक केली आहे हे तपासातूनच समोर येणार आहे.
हेही वाचाः
मनोरुग्णालयात उजळली ‘मनांची दिवाळी’! रुग्णांनी साकारले कंदील, पणत्या अन् आशेच्या ज्योती

