जळगाव : "आई-बाबा कोण हेही आठवत नाही... पण आता माझं एक स्वप्न आहे - कॉम्प्युटर इंजिनिअर व्हायचं!" असं सांगणारी ही पूजाची (नाव बदललेले आहेत) कहाणी आज अनेकांना प्रेरणा देणारी ठरतेय. जळगावमधील बालनिरीक्षणगृहात राहत असलेल्या या अनाथ मुलीनं दहावीच्या परीक्षेत तब्बल 89 टक्के गुण मिळवत मोठं यश मिळवलं आहे.

रेल्वे स्टेशनवर सापडली नकोशी : साधारणतः दहा वर्षांपूर्वी चाळीसगाव रेल्वे स्थानकावर ही बालिका बेवारस अवस्थेत आढळून आली होती. तिचं नाव, पत्ता, पालक कोणीच माहीत नव्हतं. नंतर तिला एका सामाजिक संस्थेच्या मदतीनं जळगावच्या बालनिरीक्षणगृहात दाखल करण्यात आलं. त्यावेळी फक्त 5-6 वर्षांची असलेली ही चिमुरडी आज स्वतःच्या कर्तृत्वावर उभी राहिल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
प्रतिभाताई विद्यालयात दाखल, अभ्यासात दाखवली चमक : निरीक्षणगृहाच्या वतीनं पूजाला (नाव बदलले आहेत) शहरातील प्रतिभाताई माध्यमिक विद्यालयात प्रवेश मिळाला. इथं तिनं केवळ शिक्षणच नव्हे तर क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमातही सहभाग घेतला. निरीक्षणगृहातील कर्मचारी व इतर मुलांमध्ये मिसळत राहून तिनं आपलंसं वातावरण तयार केलं. तिची अभ्यासातील आवड लक्षात घेता शिक्षकांनीही विशेष मार्गदर्शन केलं. स्वतंत्र अभ्यासाचं नियोजन, पहिला क्रमांक पटकावला. पूजानं दहावीच्या अभ्यासासाठी स्वतःचं नियोजन तयार केलं. नियमित अभ्यास, मार्गदर्शन घेणं आणि शाळेत लक्षपूर्वक शिकणं हे तिचे सूत्र राहिलं. परिणामी ती शाळेतून पहिली आली असून, विशेष प्रावीण्य मिळवलं आहे. हे तिचं यश आज सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचं स्वप्न आणि ‘क्षमता’ संस्थेची साथ : दहावी नंतर पूजानं कॉम्प्युटर इंजिनिअर बनण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तिच्या या स्वप्नाला गती देण्यासाठी निरीक्षणगृह प्रशासनानं पुण्यातील ‘क्षमता’ या संस्थेशी संपर्क साधला आहे. ही संस्था तिला पुढील शिक्षणासाठी आवश्यक ती मदत करणार असून तिचं प्रवेश, राहण्याची व्यवस्था व शैक्षणिक पाठबळ देणार आहे.
पूजाचं यश आमच्यासाठी अभिमानास्पद : अधीक्षक रविकिरण अहिरराव“अनाथ व गरजू मुलांना इथं विशेष काळजी घेऊन सांभाळलं जातं. पूजासारख्या मुलांमध्ये काहीतरी करून दाखवण्याची जिद्द असते. तिचं यश आमच्यासाठी विशेष आहे. तिला पुढे शिकण्यासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल,” असं निरीक्षणगृहाचे अधीक्षक रविकिरण अहिरराव यांनी सांगितलं. “शिकून समाजासाठी काहीतरी करायचं आहे. माझं कुणीच नाही, पण आज मला सगळं मिळालं. अभ्यास करून मोठं व्हायचं आणि समाजातल्या अशा गरजू मुलांसाठी काहीतरी करायचं आहे,” असं सांगताना पूजाच्या डोळ्यात एक नव्या स्वप्नांची चमक स्पष्ट दिसत होती.
हेही वाचा :