ETV Bharat / state

काश्मीरच्या ईडलिंबूवर विदर्भातील संत्र्याचा 'डोळा'; तुम्हाला माहितीये का कसं तयार होतं संत्र्याचं रोप? वाचा स्पेशल रिपोर्ट

पूर्वी विदर्भातल्या रंगपूर लाईम रोपावर संत्राची कलम तयार व्हायची. आता गत २० ते २५ वर्षांपासून काश्मीरच्या ईडलिंबूवरच विदर्भातील संत्र्याचा 'डोळा' आहे.

METHOD OF ORANGE TREE PLANTING
विदर्भातील संत्र्यांवर ईटीव्ही भारतचा स्पेशल रिपोर्ट (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : March 4, 2025 at 8:57 PM IST

|

Updated : March 4, 2025 at 10:45 PM IST

4 Min Read
Choose ETV Bharat

अमरावती : संत्री म्हटली की, ती विदर्भाची म्हणून प्रसिद्ध. नागपुरी संत्र्यांची ओळख संपूर्ण जगाला आहे. ही संत्री नेमकी कशी येतात?, या संत्र्यांच्या झाडांचं आगळं वेगळं वैशिष्ट्य सर्वांनाच ठाऊक असेल असं नाही. खरं तर संत्र्यांची बी ही नपुंसक असल्यानं तिच्यातून नवीन झाडांची निर्मिती होत नाही. संत्र्यांचं हे झाड‌ 'रंगपूर लाईम' या लिंबूवर्गीय फळाच्या रोपावर डोळा भरूनच निर्माण होतं. पूर्वी विदर्भातल्या रंगपूर लाईम रोपावर संत्राची कलमं तयार व्हायची. आता गत २० ते २५ वर्षांपासून काश्मीरच्या ईडलिंबूवरच विदर्भातील संत्र्याचा डोळा येत आहे. "काश्मीरच्या ईडलिंबूच्या भरवशावर विदर्भातील संत्र्याला मोठा फटका बसला," असं कृषी तज्ञ म्हणतात. पूर्वीसारखी संत्र्यांची श्रीमंती विदर्भात राहिली नसली तरी, संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी योग्य नियोजन, व्यवस्थापन केल्यास संत्री पुन्हा एकदा विदर्भाला मानाचं स्थान मिळवून देऊ शकतात. एकूणच विदर्भातील संत्र्यांची आजची परिस्थिती आणि संत्र्यांच्या भविष्यासंदर्भात 'ईटीव्ही भारत'चा हा स्पेशल रिपोर्ट...

काश्मीरमधून येतात ईडलिंबूच्या बिया : विदर्भात संत्र्याचं सर्वाधिक उत्पादन हे अमरावती जिल्ह्यातील वरूड आणि मोर्शी तालुक्यात होतं. चांदूरबाजार, अचलपूर, अंजनगाव सुर्जी या तालुक्यात गत ३० ते ४० वर्षात संत्र्यानं मोठी समृद्धी आणली. संत्रा रोपांची मोठी नर्सरी ही वरूड तालुक्यांत आहे. वरूड आणि मोर्शी तालुक्यातील नर्सरीमधल्या रोपांना चांदूरबाजार, अचलपूर, अंजनगाव सुर्जीसह लगतच्या अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात आणि नागपूर जिल्ह्यात देखील मोठी मागणी आहे.

विदर्भातील संत्र्यांवर ईटीव्ही भारतचा स्पेशल रिपोर्ट (ETV Bharat Reporter)

अशी तयार होतात संत्र्यांची रोपं : वरूड तालुक्यात येणाऱ्या शेंदुरजना घाट या गावात जिल्ह्यातील सर्वात मोठ्या संत्र्याच्या नर्सरीपैकी एक नर्सरी आहे. या गावात अनेक शेतकरी संत्र्याच्या रोपांची नर्सरी करण्यावर भर देतात. काश्मीरच्या जंगलात मोठ्या प्रमाणात ईडलिंबूची झाडं आहेत. काश्मीरमधील आदिवासी बांधव ईडलिंबूच्या बिया मोठ्या संख्येनं जमा करतात. या बिया मोर्शी आणि वरुड तालुक्यातील अनेक व्यापारी, शेतकरी खरेदी करतात आणि आपल्या शेतात ईडलिंबूचं रोप तयार करतात. साधारणतः दसरा झाल्यावर ईडलिंबूचं बी जमिनीत पेरतात. या बिया अंकुरित होऊन ईडलिंबूचं रोप तयार होतं. जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात ईडलिंबूच्या या रोपावर संत्र्यांच्या झाडाचं कलम बसवलं जातं. एक महिन्यानंतर ईडलिंबूच्या झाडावर संत्र्याच्या डोळ्यापासून संत्र्याची कलमं ही वेगळी केली जातात. वेगळी केलेली ही कलमं म्हणजे संत्र्याचं नवं रोप. या रोपाची शेतात लागवड झाल्यावर यातून पुढं मोठं झाड तयार होऊन त्याला संत्री येतात. अनेकदा काश्मीरमधील ईडलिंबूच्या रोपांऐवजी रंगपुर लाईमवर देखील संत्राचा डोळा लावून संत्र्याचं रोप घेतलं जातं. मात्र गत अनेक वर्षांपासून काश्मीरमधील ईडलिंबूवरच संत्र्याचं रोप तयार केलं जातं, अशी माहिती वरूड तालुक्यात येणाऱ्या शेंदुरजना घाट इथले शेतकरी नितीन भालेराव यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.

दोनशे वर्षांपूर्वी विदर्भात आलेला संत्रा अडचणीत : संत्री ही मुळात चीनमधली. हे फळ फार पूर्वी चीनच्या जंगलात आढळलं. आज अनेक देशांमध्ये विविध रंगांची आणि चवीची संत्री आहेत. त्या सर्व संत्र्यांवर प्रक्रिया करून त्याचा ज्यूस काढून पिला जातो. विदर्भातला म्हणजे खास नागपुरी संत्रा हा ज्यूस काढून पिण्यासारखा नाही तर हा सहज साल काढून खाण्यायोग्य आहे. यामुळंच नागपुरी संत्र्यांची ज्यूस म्हणून पिण्यापेक्षा खाण्यातच अधिक मज्जा आहे. सर्वात आधी चीनमध्ये संत्री आढळली. विदर्भात 200 वर्षांपूर्वी नागपूरचे रघुजी राजे भोसले यांनी संत्र्यांची कलमं आणून नागपूरमध्ये लावली. पुढं संत्र्याच्या एका वृक्षाची अनेक वृक्ष झालीत. विशेष म्हणजे, त्यावेळी देखील ईडलिंबूच्या कलमांवर सत्राच्या कलमाचा डोळा लावून संत्र्याची स्वतंत्र कलमं तयार करण्यात आली. खरं तर, हे तंत्र फार पूर्वीपासून आहे. या तंत्राच्या सहाय्यानंच नागपूर आणि अमरावती जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढलेल्या संत्र्यांना विदर्भाला संत्र्याचा प्रदेश अशी ओळख दिली, अशी माहिती श्री शिवाजी कृषी महाविद्यालयातील वनस्पती शास्त्र विभागाचे प्राध्यापक राजेंद्र पाटील यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.

संत्री का आली अडचणीत? : एकेकाळी अनेक गावात संत्रा फळांनं समृद्धी निर्माण केली. परंतु, आज परिस्थिती बिकट आहे. चांदूरबाजार, अचलपूर, अंजनगाव सुर्जी या भागात संत्रा उत्पादक शेतकरी आपल्या शेतातून संत्र्याची झाडं तोडून फेकत आहेत. पूर्वी शेतामध्ये 40 ते 50 वर्षांपर्यंत संत्र्यांची झाडं राहायची. ती भरपूर फळं द्यायची. आता मात्र या झाडांचं आयुष्य पंधरा वर्षांवर आलं. पूर्वीसारखं भरपूर पाणी, सुपीक जमीन आता राहिली नाही. पाऊस देखील पूर्वीसारखा राहिला नाही. यामुळं विदर्भातील संत्री अडचणीत आली, असं मत प्रा. राजेंद्र पाटील यांनी व्यक्त केलं.

अशी आहेत कारणं :

  1. पूर्वी असलेलं जमिनीचं मगदूर आज राहिलं नाही.
  2. हवामान, पर्जन्यमान आणि व्यवस्थापनात झालेला बदल.
  3. नर्सरीची संख्या वाढल्यानं कमी किंमतीत चुकीच्या कलमांची खरेदी.
  4. कलमांची आनुवंशिक शुद्धता घटली.
  5. चुकीच्या ठिकाणी कलमांची लागवड
  6. हवामान बदल आणि सेंद्रीय निविष्ठांचा योग्यपणे वापर न होणं, जलसिंचनाची चुकीची पद्धत.
  7. पूर्वीसारखी बाजारपेठ आता नागपुरी संत्र्याला नाही. नागपुरी संत्र्याला किनो या संत्र्यानं स्पर्धा निर्माण केली.

काश्मीरच्या ईडलिंबूपेक्षा रंगपुर लाईम योग्य : "काश्मीरमधून येणाऱ्या ईडलिंबूच्या कलमांच्या तुलनेत फार पूर्वीपासून असणाऱ्या रंगपुर लाईमच्या खुंटावर संत्र्याच्या रोपाचा डोळा भरला तर, ते झाड काश्मिरी इडलींबाच्या तुलनेत अधिक चांगलं आहे," असं प्रा. राजेंद्र पाटील यांनी सांगितलं.

काश्मिरी ईडलिंबू आणि रंगपुर लाईमची तुलना :

  1. काश्मिरी ईडलिंबूद्वारे तयार होणारं संत्र्याचे रोप अनुवंशिक शुद्ध नाही. ते जमिनीत मजबूत देखील राहत नाही. फ्लायटॉप्थोरा या आजारानं नष्ट होतं.
  2. रंगपूर लाईमवर तयार होणारं झाड हे पाण्याच्या तानाला सहन करणारं असतं. फ्लायटॉप्थोरा या आजाराचा प्रतिकार करतं.
  3. काश्मिरी ईडलिंबूवर येणाऱ्या संत्र्याच्या झाडांची वाढ झपाट्या होते. पानं आणि झाडाचा आकारमान मोठा असतो.फळांचा आकार देखील मोठा असतो मात्र फळं थोडी वाकडी तिकडी असतात मात्र भरपूर प्रमाणात येतात.
  4. रंगपूर लाईमच्या खुंटावर येणाऱ्या संत्र्याचं झाड हे पाण्याचा ताण सहन करणारं आहे. फळांची संख्या मर्यादित असते.ही फळं मध्यम गोलाकार असतात. हे फळ निर्यातक्षम आहेत.
  5. काश्मिरी ईडलिंबूमध्ये बियांची संख्या फार जास्त असल्यानं याची रोपं मोठ्या संख्येनं तयार होतात.
  6. रंगपूर लाईमवर तयार झालेल्या झाडावर संत्री कामी प्रमाणात उपलब्ध होतात.

शुद्ध बीजापोटी फळ रसाळ गोमटी : "आज विदर्भातील संत्रा उत्पादक आणि संत्र्याची परिस्थिती बिकट असली तरी, योग्य व्यवस्थापन आणि योग्य नियोजन केल्यास विदर्भातल्या संत्र्याला पुन्हा एकदा मोठी प्रतिष्ठा मिळू शकते. त्यामुळं संत्रा उत्पादक पुन्हा एकदा समृद्ध होऊ शकतात. 'शुद्ध बीजापोटी फळ रसाळ गोमटी' असं जे म्हटलं जातं. त्याप्रमाणं संत्रा रोपांची अनुवंशिकता तपासून शेतकऱ्यांनी संत्र्याची झाडं लावणं गरजेचं आहे. संत्रा लागवडीचं योग्य तंत्र, शास्त्र, योजन, व्यवस्थापन आणि कौशल्य या सर्व बाबींनी आपण संत्रा बाग पुन्हा व्यवस्थित उभ्या करू शकतो. विश्वासपात्र नर्सरीधारकांकडून खात्रीशीर कलमा आणून त्याची शास्त्रीय पद्धतीनं लागवड केली. तर, संत्रा पुन्हा एकदा विदर्भात समृद्धीची आशा निर्माण करणारं पीक ठरू शकेल," असा विश्वास प्रा. राजेंद्र पाटील यांनी व्यक्त केला.

हेही वाचा :

  1. फळं आणि तृणधान्याचं महत्त्व पटवून देण्यासाठी कोल्हापुरात 'मिलेट महोत्सवा'चं आयोजन
  2. ऊस शेतीला पूरक 'आफ्रिकन बोअर' शेळीपालन, कोल्हापूरच्या दोन तरुणांनी धुंडाळली वेगळी वाट
  3. सात किलो वजनापर्यंतचे पिकवले कलिंगड; शेतकरी बंधुंनी केली किमया
Last Updated : March 4, 2025 at 10:45 PM IST