ETV Bharat / state

रत्नागिरी, पुणे, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; येत्या 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता

रत्नागिरी येथे मुंबई-गोवा महामार्गावरील खेड तालुक्यातील वळंजवडी येथे महामार्गावर 100 मीटर परिसरात भेगा पडल्याने या महामार्गावरील वाहतूक एकेरी मार्गावरून सुरू आहे.

Heavy rain likely in the next 24 hours
येत्या 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : June 17, 2025 at 3:21 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यभरात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झालाय. भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार पुढील 24 तासांकरिता रत्नागिरी, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. राज्यात मागील 24 तासांमध्ये (17 जून 2025 रोजी सकाळपर्यंत) मुंबई उपनगर जिल्ह्यात 83.4 मिमी पाऊस झालाय. तर ठाणे जिल्ह्यात 73.7 मिमी, मुंबई शहर 62.9 मिमी, रायगड 54.1 मिमी आणि पालघर जिल्ह्यात 49.7 मिमी इतक्या सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.

रस्ता पाण्याखाली जाऊन खचल्याने वाहतूक बंद : रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदी इशारा पातळीवर आहे. जिल्हा प्रशासनामार्फत नागरिकांना सतर्क राहाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रत्नागिरी येथे मुंबई-गोवा महामार्गावरील खेड तालुक्यातील वळंजवडी येथे महामार्गावर 100 मीटर परिसरात भेगा पडल्याने या महामार्गावरील वाहतूक एकेरी मार्गावरून सुरू आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण-चिपळूण राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीसाठी केलेला पर्यायी रस्ता पाण्याखाली जाऊन खचल्याने वाहतूक बंद करण्यात आलीय. दुचाकी आणि चार चाकी वाहतूक नेरळे-माणगाव-मणेरी-चाफेर-संगमनगर धक्का मार्गे कोयनानगर अशी वळवण्यात आलीय.

मातीच्या ढिगार्‍याखाली सापडून एका व्यक्तीचा मृत्यू : मुंबई उपनगर जिल्ह्यात पाण्यात बुडून एक व्यक्ती आणि मातीच्या ढिगार्‍याखाली सापडून एक व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर झाड पडून तीन व्यक्ती जखमी, स्लॅब पडून दोन व्यक्ती जखमी आणि भिंत पडून दोन व्यक्ती जखमी झाल्यात. तसेच यवतमाळ जिल्ह्यात पाण्यात बुडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून, धुळे जिल्ह्यात भिंत पडून चार प्राण्यांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आलीय.

पावसाची सरासरी आकडेवारीसुद्धा समोर : राज्यात कालपासून आज 17 जून रोजी सकाळपर्यंत झालेल्या पावसाची सरासरी आकडेवारीसुद्धा समोर आलेली आहे. ठाणे 73.7, रायगड 54.1, रत्नागिरी 47.7, सिंधुदुर्ग 12.7, पालघर 49.7, नाशिक 7.7, धुळे 7.1, नंदुरबार 4, जळगाव 6.7, अहिल्यानगर 1.1, पुणे 11.9, सोलापूर 0.9, सातारा 19.7, सांगली 6, कोल्हापूर 17.8, छत्रपती संभाजीनगर 0.6, जालना 0.1, बीड 0.7, लातूर 0.1, धाराशिव 1.6, नांदेड 3.6, परभणी 1.7, हिंगोली 3.6, बुलढाणा 3.5, अकोला 8.7, वाशिम 8.5, अमरावती 9.4, यवतमाळ 8.7, वर्धा 7.6, नागपूर 0.9, गोंदिया 0.2, चंद्रपूर 11.9 आणि गडचिरोली जिल्ह्यात 5.2 मिमी पावसाची नोंद झाली आहे.