मिरा भाईंदर : मिरा-भाईंदर गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार १५ एप्रिलला सायंकाळी नवघर परिसरातील मोतीलाल नगर इथल्या एका घरावर छापा टाकला. यावेळी या घरात ११ किलो ८३ ग्रॅम इतकं कोकेन जप्त करण्यात आलं. सबीना शेख अस ड्रग्ज विक्री करणाऱ्या महिलेचं नाव आहे. तिची अधिक चौकशी केली असता, धक्कादायक माहिती समोर आली.
नायजेरियन नागरिकांकडून ड्रग्जचा पुरवठा : नवघर पोलीस ठाणे हद्दीतील मोतीलाल नगरातील एका महिलेच्या घरात कोट्यवधी रुपयाचे ड्रग्ज असल्याची माहिती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख यांना मिळाली. त्यांनी पडताळणी करून सदर महिलेच्या घरी १५ एप्रिलला सायंकाळी आपल्या टीमसह छापा टाकला. या छाप्यात ११ किलो ८३ ग्रॅम इतके कोकेन मिळाले. तसंच ८० हजार रुपयांची रोख रक्कम देखील तिथं सापडली. सदर महिलेला ताब्यात घेतल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकानं चौकशी केली असता, हे ड्रग्ज नायजेरियन महिला आणि पुरुष पुरवत असल्याची माहिती समोर आली.
नायजेरियन नागरिकांकडून ड्रग्ज जप्त : "पोलिसांनी मिरारोडमधून नायजेरियन पुरुषाला ताब्यात घेतलं. यावेळी पोलिसांनी त्याच्याकडून कोकेन जप्त केलं. त्याची किंमत ३.९ कोटी रुपये इतकी आहे. या प्रकरणात नायजेरियन महिलेचा समावेश असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वसईमधून नायजेरियन महिलेला ताब्यात घेतलं. तिची झाडाझडती घेतली असता तिच्याकडं कोकेन सापडलं. "ड्रग्ज प्रकरणी तीन आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे," अशी माहिती पोलीस उपायुक्त गुन्हे, अविनाश अंबुरे यांनी दिली.
पोलीस हवालदारच ड्रग विक्री सामिल : मुंबई महसूल संचालनालयाकडून मागील आठवड्यात लातूरमध्ये एका शेतात मॅफेड्रोन ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला होता. हा ड्रग्जचा कारखाना चालवणारा मुख्य सूत्रधार मीरा भाईंदर मधील पोलीस हवालदार प्रमोद केंद्रे असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. पुढील आठवड्यात कोट्यवधी रुपयाचे ड्रग्ज मीरा-भाईंदरमध्ये आढळल्यानं एकच खळबळ उडाली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्ज शहरात येतच कसं? हा प्रश्न उपस्थित होत आहे. लातूरमध्ये उद्ध्वस्त करण्यात आलेल्या ड्रग्जचा कारखाना त्याचे कनेक्शन मीरा-भाईंदरशी असल्याचं आढळून आलं आहे. त्यातच गुन्हे शाखेनं आता २२ कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त केल्यानं खळबळ उडाली आहे. त्यामुळं मीरा-भाईंदर शहरात ड्रग्जचं जाळं मोठ्या प्रमाणात पसरलं आहे का? हा प्रश्न देखील उपस्थित होत आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळं ड्रग्सचं मोठं रॅकेट उघडकीस आलं आहे.
हेही वाचा :
ईडी विरोधात काँग्रेसचं आंदोलन, देशाला विभाजित करण्याचा प्रयत्न; भाजपावर हल्लाबोल
वकिलानं चोरट्यांना उद्देशून घरावरच लिहून ठेवलं पत्र; नेमका कशामुळे पत्रपंपच?
आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाही; हिंदी लादणार असाल तर संघर्ष अटळ-राज ठाकरेंचा इशारा